सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपचा पुढाकार

भाजप नेते विशाल परब यांची घोषणा; प्रशिक्षणार्थी योग शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचा प्रसार करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. विविध ठिकाणी योग कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच योगा सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची घोषणा भाजप नेते विशाल परब यांनी केली.

सावंतवाडी येथील मांगिरीश हॉलमध्ये अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ आणि फिटनेस योग फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आयोजित योग प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थींना विशाल परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीला चालना मिळते. त्यामुळे योग हा केवळ व्यायामापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला पाहिजे. ग्रामीण आणि शहरी भागांत योगाविषयी जनजागृती करून नागरिकांना नियमित योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे परब यांनी सांगितले. या कार्यक्रमाला योग प्रशिक्षक शेखर बांदेकर, संस्थेचे यशवंत आरोसकर, शिवा गावडे, निशिगंधा सावंत, रेवती सावंत तसेच योग प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!