मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर हलवा

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी

मालवण : मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केंद्रात नोंदले जात नाहीत. त्यामुळे संबंधित मंडळातील शेतकरी पिक विम्यापासून गेली दोन वर्षे वंचित राहत आहेत. तरी हे स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे, अशी मागणी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पालकमंत्री नितेश राणेंकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सन २०२२/२३ मध्ये महावेद प्रकल्प अंतर्गत वेगुर्ला तहसील कार्यालयासमोर असलेले स्वयंचलित हवामान केंद्र बदलून कुशेवाडा येथे नेण्यात आले होते. याच धर्तीवर मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे जेणेकरून ग्रामीण स्तरावरील सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळू शकेल, असे श्री. चिंदरकर यांनी या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, विजय निकम, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!