भारतीय मजदूर संघाच्या पाठपुराव्याला मोठे यश!

मालवणमधील २०५ घरेलू कामगारांना दत्ता सामंत यांच्या हस्ते संसारोपयोगी भांडी संचांचे वाटप

सिंधुदुर्गातील ९१६ पात्र कामगारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी; दिवाळीपूर्वी शासनाच्या योजनेचा लाभ मिळाल्याने कामगारांमध्ये समाधान

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या संसारोपयोगी भांडी संच वाटप योजनेचा लाभ अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घरेलू कामगारांना मिळाला आहे. भारतीय मजदूर संघाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जिल्ह्यातील ९१६ पात्र घरेलू कामगारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील २०५ घरेलू कामगारांचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कामगारांना संसारोपयोगी भांडी संचांचे वाटप करण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२४ मध्ये जारी केलेल्या शासन आदेशानुसार पात्र नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी ही योजना राबविण्यात आली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील अनेक पात्र कामगारांना भांडी संचांचा लाभ मिळाला होता. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ जुलै २०२४ पूर्वी नोंदणी झालेल्या ९१६ पात्र घरेलू कामगारांना या लाभापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाने शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

या प्रश्नाबाबत कामगार मंत्री आकाश फुंडकर, खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शासनस्तरावर प्रयत्न करण्यात आले. अखेर या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि जिल्ह्यातील वंचित पात्र कामगारांसाठी भांडी संच मंजूर झाले.

मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात २०५ घरेलू कामगारांना भांडी संचांचे वितरण करण्यात आले. यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या संसाराला हातभार लागला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी घरेलू कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर भाष्य केले. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून, त्यांच्या विविध मागण्या मार्गी लावण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दत्ता सामंत, ममता वराडकर यांच्या उपस्थितीत वितरण

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत, मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालविकास सभापती अन्वेशा आचरेकर, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, मेघा सावंत, पूजा खराडकर, सौ. प्रभाळे, गणेश परब आदी उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव तथा बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा केला. यावेळी भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा सीमा धुरी, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, सहसचिव शुभांगी सावंत, निनाद बादेकर, शुभम लुडबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दीर्घकाळापासून शासनाच्या लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या ९१६ घरेलू कामगारांना अखेर न्याय मिळाल्याने भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नांचे लाभार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

error: Content is protected !!