दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला तो कारचालक नेहमीच सुSSSSस्साट….
वर्षभरात ओव्हरस्पीडच्या तब्बल ७ केसीस !
सिंधुदुर्गच्या “आरटीओ” ला आतातरी जाग येणार का ?
कुणाल मांजरेकर
मालवण : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री मालवण – आचरा महामार्गावर घडली आहे. या दुर्घटनेनंतर या कारचालकाला असलेल्या वेगाच्या नशेची नवीन माहिती उजेडात आली आहे. वर्षभरातच हा कारचालकाने तब्बल सातवेळा भरधाव वेगाने कार चालवल्या प्रकरणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र या दंडात्मक कारवाईनंतरही त्याने बोध न घेतल्याने रविवारी रात्री रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांना हकनाक स्वतःचे प्राण गमवावे लागले. ह्या अपघात प्रकरणी पोलीस आपली कारवाई करतील, मात्र जिल्ह्याचा “आरटीओ” विभाग ह्या सुसाट कारचालकावर कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
uमालवण येथून आचऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती एस- प्रेसो (क्र. एम. एच. ०७ – एजी ४०२५) ह्या कारने रविवारी रात्री आचरा हायस्कूल जवळ रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे, त्यांची मुलगी परी आणि सहकारी जमेंदर प्रसाद यांना पाठीमागून धडक दिली. या दुर्घटनेत जखमी तिघांना कणकवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यापैकी दीपक लोणे आणि जमेंदर प्रसाद यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर लोणे यांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कारचालक कृष्णा राणे (वय- ६०, रा. जानवली कणकवली) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या दुर्घटनेनंतर ह्या कारचालकाला असलेल्या वेगाच्या नशेचे किस्से समोर येत आहेत. मागील वर्षभरातच ह्या कारचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून वेग मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्याच्यावर तब्बल सातवेळा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर २०२०, २ डिसेंबर २०२०, २ फेब्रुवारी २०२१, ७ फेब्रुवारी २०२१, २२ फेब्रुवारी २०२१, २७ जून २०२१ आणि २२ जुलै २०२१ ह्या दिवशी ह्या कारचालकावर भरधाव वेगाने गाडी चालवल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या रडारवर आल्याने ही कारवाई झाली असली तरी या व्यतिरिक्त आणखी कितीवेळा ह्या कारचालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन केले, हे सांगणे अवघड आहे. एखाद्या वाहनचालकावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वेग मर्यादेचे उल्लंघन करण्यामुळे कारवाई झाली असल्याने जिल्ह्याच्या आरटीओ विभागाने यापूर्वीच त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक होते. तर रविवारची दुर्घटना नक्की टळली असती. निदान या दुर्घटनेनंतर कारचालकाचे रेकॉर्ड लक्षात घेऊन जिल्ह्याच्या आरटीओ विभागाने या कारचालकावर कठोर करावाई करीत त्याचा वाहन चालवण्याचा परवाना कायम स्वरूपी रद्द करावा, अशी मागणी होत आहे.