
मनुष्यबळापासून पायाभूत सुविधांपर्यंत सर्व प्रश्न तातडीने सोडवा ; मंत्री नितेश राणेंचे आढावा बैठकीत निर्देश
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक आणि अन्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि इतर सर्व आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य व्यवस्थेशी संबंधित कोणतेही प्रश्न प्रलंबित ठेवू नयेत आणि विकासकामे वेळ न दवडता पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमधील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग येथील एस-२३ आणि एस-२० विशेषज्ञांची रिक्त पदे भरण्यासोबतच जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वर्ग-१ ते वर्ग-४ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे नमूद केलेल्या रुग्णालयांसाठी आवश्यक अनुदान, बांधकामे आणि अन्य प्रलंबित कामांचा देखील आढावा घेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा
सिंधुदुर्गमध्ये स्थानिक नागरिकांसोबतच वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि बाहेरील नागरिकांची वर्दळ असते. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या आणखी वाढते. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. उपलब्ध आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेऊन जिथे अधिक गरज आहे, तिथे प्राधान्याने मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रलंबित कामांना ‘डेडलाइन’
आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच नागरिकांना प्रभावी आणि समाधानकारक आरोग्यसेवा मिळेल, यासाठी विभागांनी समन्वयाने आणि तातडीने काम करावे, असेही नितेश राणे यांनी निर्देशित केले.






Subscribe to my channel






