
बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर; पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत पत्र प्राप्त
मालवण : देवबाग (ता. मालवण) येथील यश देवानंद चिंदरकर यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) ३ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीनंतर यश चिंदरकर यांच्या उपचारासाठीच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने चिंदरकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
यश चिंदरकर याच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचार होणार आहेत. या उपचारासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून २१ ऑगस्ट २०२६ रोजी आर्थिक मदतीची विनंती करण्यात आली होती.
या मागणीचा विचार करून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ३ लाख रुपयांची मदत तत्त्वतः मंजूर करण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून १६ सप्टेंबर २०२६ रोजी हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकांना अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.
राणेंच्या पाठपुराव्याला यश
यश चिंदरकर यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीमुळे महत्त्वाची चालना मिळाली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मिळालेल्या या आर्थिक सहाय्यामुळे महागड्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचाराच्या खर्चाचा काही भाग भागविण्यास कुटुंबाला मदत होणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरीपत्रानुसार, रुग्णाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचाराची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष झालेल्या पात्र उपचार खर्चाचा तपशील निर्धारित नमुन्यात सादर करण्याच्या सूचना हॉस्पिटलला देण्यात आल्या आहेत. मंजूर रक्कम केवळ पात्र उपचार खर्चासाठीच वापरण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या मंजुरीपत्राची प्रत यश चिंदरकर याचे वडील देवानंद परशुराम चिंदरकर, देवबाग तसेच खासदार नारायण राणे यांनाही पाठविण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अंडर सेक्रेटरी (फंड्स) प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे.
बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या खर्चिक उपचाराच्या काळात PMNRF मधून मिळालेली ३ लाखांची मदत चिंदरकर कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीनंतर या मदतीला मंजुरी मिळाल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.







Subscribe to my channel






