आ. निलेश राणे यांना टार्गेट करता करता वैभव नाईकांकडून स्वतःचीच पोलखोल; “त्या” व्हिडीओतील रस्ते तुमच्याच कार्यकाळातील’!

तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांचा घणाघाती पलटवार; आ. निलेश राणेंनी दोन वर्षांत कोट्यवधींचा निधी आणला

मालवण : माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार निलेश राणे यांना टार्गेट करण्यासाठी मालवण तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. मात्र मागील दहा वर्षात वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणतीही रस्त्याची कामे न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून निलेश राणे आमदार झाल्यानंतर दोन वर्षात त्यांनी कोट्यावधीचा निधी आणला आहे. त्यामुळे हे व्हिडीओ पोस्ट करुन माजी आमदार वैभव नाईक व त्यांचे सहकारी स्वतःच्याच कार्यकाळातील अपयशाची पोलखोल करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

आमदार निलेश राणे यांच्या कोणार्क येथील जन संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, गणेश परब, शिवाजी केळूसकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. लुडबे म्हणाले, मालवण-कुडाळ मतदारसंघात दहा वर्षे आमदार असताना रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यात नाईक व तत्कालीन खासदार विनायक राऊत अपयशी ठरले. आज त्याच रस्त्यांचे व्हिडिओ दाखवून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. “ज्या रस्त्यांची आज दुरवस्था दाखवत आहेत, ते रस्ते त्यांच्या स्वतःच्या कार्यकाळातील आहेत,” असा टोला लुडबे यांनी लगावला.

दहा वर्षांच्या काळातील अपयशी कारभारामुळे मालवण-कुडाळमधील अनेक रस्ते नादुरुस्त झाले असल्याचा आरोप करत, आता आमदार निलेश राणे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गतिमान पद्धतीने काम करत असल्याचे लुडबे यांनी म्हटले आहे.

निलेश राणेंच्या कार्यकाळात ओरोस-कसाल-मालवण रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी आशियाई विकास बँकेकडून ३०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सुमारे ३५ किलोमीटर लांबीचा आणि ७ मीटर रुंदीचा हा रस्ता प्रस्तावित आहे. तसेच राज्य अर्थसंकल्पातून ६ कोटी रुपये, रस्ते दुरुस्तीसाठी २० कोटी रुपये, तर २५/१५ अंतर्गत मालवण-कुडाळसाठी आणखी ४ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत. गावपातळीवर २५/१५ अंतर्गत ६.१९ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून काही किरकोळ कामे प्रगतीपथावर आहेत. राज्य सरकारकडून विविध माध्यमातून ३१ कोटी रुपयांहून अधिक निधी आणण्यात आला आहे.

याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २०२५-२६ मध्ये ३२ कोटी ४५ लाख रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाला असून तो जवळपास खर्च झाला आहे. तर २०२६-२७ च्या पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यांची कामे दिवाळीनंतर सुरू होतील. मालवण तालुक्यातील सुमारे ६१ किलोमीटर मुख्य रस्ते व राज्यमार्ग आणि १४१ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्गांची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘वर्षभरात रस्ते व्यवस्थित करण्याचा संकल्प’

पावसाळ्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना काहीसा वेळ लागत असला तरी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील रस्ते १०० टक्के दुरुस्त करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे लुडबे यांनी सांगितले. येत्या वर्षभरात मालवणमधील रस्त्यांचे चित्र बदलणार असून, शिवसेना-महायुती त्यासाठी कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी, व्यापारी, पर्यटन व्यावसायिक, कलावंत, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आमदार निलेश राणे काम करत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेली टीका ही त्यांच्या अस्वस्थतेतून होत असून, या टीकेतूनच मागील दहा वर्षांच्या कारभाराचे अपयश अधोरेखित होत असल्याचेही मंदार लुडबे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!