मंत्री नितेश राणे यांचा निर्णय ; आंबा, काजू पिकाचे नुकसान, लांबलेला पाऊस, पाणी टंचाई आणि दुष्काळाचे सावट यामुळे घेतला निर्णय
आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे : कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर .
राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येत्या २३ जून रोजी येणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एक्स पोस्ट करुन त्यांनी याची माहिती दिली आहे.
आपल्या एक्स पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेले अतोनात नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, राज्यभर एल-निनोच्या सावटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर, यंदा दि. २३ जून रोजी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
अशा कठीण काळात आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे आहे. माझ्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की, प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ करावी व विविध समाजपयोगी उपक्रम राबवावेत. हिंदुत्वाच्या संस्कारातून गौमातेची सेवा, गौसंवर्धनाच्या कार्यात सहभाग तसेच गरजूंना मदत आणि समाजहिताचे कार्य हेच खरे उत्सवाचे स्वरूप आहे. तुमचा हा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल…! असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.