आचरा बंदरातील “त्या” कथित हल्ल्याबाबत पर्ससीन धारकांनी उपस्थित केला प्रश्न !
पर्ससीन मच्छीमारांच्या उपोषणाची धार कमी करण्यासाठी हल्ल्याचे षडयंत्र ?
हल्ला करण्याची प्रवृत्ती पारंपरिक मच्छीमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांचीच : अशोक सारंग
कुणाल मांजरेकर
मालवण : आचरा बंदरावर मत्स्यव्यवसाय अधिकारी व सागरी सुरक्षा रक्षक यांच्यावर पर्ससीन धारकांकडून हल्ला झाल्याच्या कथित चर्चेमुळे खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी अद्याप मत्स्यव्यवसाय खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने या हल्ल्या बाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, १ जानेवारी पासून सुरू असलेल्या पर्ससीन मच्छीमारांच्या उपोषणाची धार कमी करण्यासाठी हल्ल्याचे षड्यंत्र आखण्यात आल्याचा आरोप पर्ससीन मच्छिमार नेते अशोक सारंग यांनी केला आहे. हल्ला करण्याची प्रवृत्ती पर्ससीन मच्छिमारांची नसून स्वतःला पारंपरिक मच्छीमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांची असल्याचा पलटवार देखील श्री. सारंग यांनी केला आहे.
यापूर्वी निवती येथील समुद्रात मालवण परिसरातील ४० ते ५० नौकाधारकानी तथाकथित मच्छिमार नेत्यांच्या नेतृत्वाखाली
पारंपरिक मच्छीमार बांधवांना हाताशी धरून निवती येथील पर्ससीन धारकांवर दगड, शिसे, काचेच्या बॉटलने हल्ला केला होता आणि याची पोलीस केस सुद्धा निवती पोलीस स्टेशनला झाली होती. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयात पारंपारिक नेतृत्वाखालील गटाने माफीनामा लिहून दिला होता. तसेच आचरा बंदर येथे याच नेत्यांनी पारंपरिक लोकांच्या मदतीने मिनी पर्ससीन धारकांवर हल्ला चढवून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला होता. यावेळी एक पर्ससीन नौका पूर्णपणे जाळून टाकली होती ही वस्तुस्थिती आहे. हे प्रकरण सुद्धा न्यायप्रविष्ट आहे.
यापूर्वी पारंपरिक मच्छीमारांचे नेते म्हणणारे काही जण समुद्रात लूटमार करत होते अशी चर्चा होती. गोव्यातील नौका लुटमार केली असता, नौका मालकांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यात सुद्धा पारंपरिक गटाच्या नेत्यांनी पर्ससीन धारक गोपीनाथ भगवान तांडेल यांचे नाव घेऊन त्यांना अडचणीत आणले होते. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. त्यातील सत्य काय आहे ते बाहेर येणारच आहे.
या पार्श्वभूमीवर आता आचरा बंदर येथे मत्स्यव्यवसाय अधिकारी व सागरी सुरक्षा रक्षक यांच्यावर हल्ला झाला असे म्हटले जात आहे. मात्र हा प्रकारही पारंपरिक मच्छिमार नेत्यांच्या कटाचाच एक भाग असू शकतो. गेले चोवीस दिवस पर्ससीन धारक विविध मागण्यांसाठी, नव्या कायद्या विरोधात शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत. अश्या स्थितीत पर्ससीन मच्छीमारांच्या मागण्या मान्य झाल्या तर काही जणांची नेतेगिरी संपुष्टात येईल अशी भीती वाटत असल्याने पर्ससीन धारकांना अडचणीत आणण्यासाठी हा कथित हल्ला प्रकार भडकवण्याचा प्रकार सुरू आहे. काहीजण सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या कार्यालयात येऊन संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तथाकथित हल्ला पर्ससीन धारकानी केला असून त्यांची नावे द्या, असा दबाव टाकत आहेत. जेणेकरून पर्ससीन धारकांच्या उपोषणाची धार कमी होईल, पर्ससीन धारक यांची बदनामी होईल याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नाहक आरोप करून पर्ससीन धारक यांचे नाव गुंतवले जात असल्याचा आरोप श्री. सारंग यांनी करून जनतेसमोर वस्तुस्थिती पोहचणे गरजेचे असल्याने पर्ससीन मच्छिमार यांच्या वतीने आम्ही भूमिका मांडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.