“त्या” शिवसैनिकांनी आता राज्य सरकार विरोधात आंदोलन छेडण्याची गरज !
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला ; पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात कुडाळमध्ये भाजपचे आंदोलन
कुडाळ : केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेल वरील करात ५ रुपयांची कपात करून जनतेला थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यानीही आपापल्या क्षेत्रात पेट्रोल- डिझेलचे दर कमी केले असून महाराष्ट्रात राज्य सरकारने असा कोणताही दिलासादायक निर्णय न घेतल्याने भाजपने गुरुवारी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना निवेदन देऊन केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने देखील पेट्रोल- डिझेल वरील कर कपात न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढी विरोधात काही दिवसांपूर्वी कुडाळ मध्ये सायकल रॅली काढणाऱ्या शिवसैनिकांनी आता राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील कर कपात केली आहे तसेच भाजपप्रणीत राज्य सरकारने सुद्धा कर कपात केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या महाविकास आघाडीने सुद्धा दर कपात करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने तहसीलदार अमोल पाठक यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, जिल्हा कार्यकारणी निमंत्रक राजू राऊळ, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, महिला आघाडी नेत्या सौ. अस्मिता बांदेकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चाचे रूपेश कानडे, रुपेश बिडये, श्रीपाद तवटे, पंचायत समिती सदस्य भास्कर नाईक, सुप्रिया वालावलकर, बंड्या सावंत, अविनाश पराडकर, राजेश पडते, माजी सभापती राजन जाधव, विजय कांबळी, निलेश परब, आदिती सावंत, रेवती राणे, स्नेहा सावंत, मुक्ती परब, सुर्यकांत नाईक, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, अभिषेक राऊळ, राकेश नेमळेकर, तन्मय वालावलकर आदी उपस्थित होते. यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या. या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय….. ठाकरे सरकार हाय हाय….. या घोषणांनी तहसील कार्यालय घुमले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोल वरील करात कपात केली आहे. भाजपप्रणीत राज्य सरकारने सुद्धा कर कपात केली आहे. मात्र महाविकास आघाडी असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप कर कपात केलेली नाही. जर पेट्रोल डिझेल वरील करकपात झाली तर वाहनधारकांना दिलासा मिळू शकेल असे सांगून केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडणाऱ्या शिवसैनिकांनी आता राज्य सरकारच्याविरोधात डिझेल पेट्रोल वरील कर कपात करण्यासाठी आंदोलन करावे, असे आवाहनही राजन तेली यांनी केले.