Malvan | भूमिपूजन कार्यक्रमात आ. निलेश राणेंकडून मालवणकरांना ‘विकासाचा शब्द” 

मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्ती, रॉक गार्डन नूतनीकरण व नमो उद्यान अशा १३ कोटींच्या कामांचे भूमिपूजन : नाट्यगृह सुशोभीकरणासाठी आणखी साडेतीन कोटी मिळणार

भुयारी गटारचे रखडलेले काम वर्षभरात पूर्ण करणार : नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दर आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधीमुक्त कचरा प्रकल्प, नवीन बायपास रस्ता, दर्जेदार नळपाणी योजना यासह विकास कामे मार्गी लावणार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यातच आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराच्या विकासासाठी धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे. या कालावधीत शहरासाठी ७० ते ८० कोटींचा निधी आणण्यात ते यशस्वी ठरले असून काही महिन्यांपूर्वी नाट्य कलाकार व नाट्य रसिकांच्या टिकेला बळी पडलेल्या मामा वरेरकर नाट्यगृहाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ११ कोटींचा निधी आ. राणे यांनी आणला आहे. या कामासह रॉक गार्डन सुशोभिकरण व नमो गार्डन या कामांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या १३ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या भूमिपूजन कार्यक्रमात आ. निलेश राणेंकडून मालवणकरांना ‘विकासाचा शब्द” देताना शहरातील भुयारी गटारचे रखडलेले काम वर्षभरात पूर्ण करणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधीमुक्त कचरा प्रकल्प राबवणे, शहराच्या प्रवेशद्वारा समोरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जरीमरी मंदिराकडून नवीन बायपास रस्ता, दर्जेदार नळपाणी योजना अशी विकास कामे मार्गी लावणार असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दर आठवड्याला या कामांचा आढावा घेण्याच्या सूचना देखील आमदार निलेश राणे यांनी दिल्या आहेत.

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, बाबा परब, विश्वास गावकर, भालचंद्र केळुसकर, सूर्यकांत फणसेकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, राजू बिडये यांच्यासह अन्य नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या शहराला काहीही दिले नाही. मात्र, आम्ही अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत मालवणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. मालवण शहराचा कायापालट करून या शहराला २१ व्या शतकातील जगाला हेवा वाटेल असे आधुनिक शहर बनवणार, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मामा वरेरकर सभागृहाच्या दुरावस्थेचा आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंचा उल्लेख करत आमदार निलेश राणे म्हणाले, निवडणुकीत मी मालवणवासीयांना शब्द दिला होता की मामा वरेरकर सभागृहाला आधुनिक रूप देणार, तो शब्द आज १०० टक्के पाळला आहे. मामा वरेरकर सभागृह आणि कुडाळ येथील मच्छिंद्र कांबळी सभागृहासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी खर्च झाल्यानंतर फिनिशिंगच्या कामासाठी पुढील साडेतीन कोटी रुपये आणले जातील. या वास्तू आता पुढील १०० वर्षे दिमाखात उभ्या राहतील.

विकासात्मक निधीबाबत बोलताना निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. नगरविकास खात्याकडून जेव्हा जेव्हा आम्ही मालवण आणि कुडाळच्या विकासासाठी निधी मागितला, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी एका मिनिटात अधिकाऱ्यांना बोलावून १५ दिवसांत जीआर काढण्याचे आदेश दिले. त्यांनी कधीही कामाला ‘नाही’ म्हटले नाही. बंदर खातेही पालकमंत्र्यांकडे असल्याने किनारपट्टीच्या विकासासाठी पुढील ५ वर्षांत २०० ते ३०० कोटी रुपये खर्च केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मालवणच्या पायाभूत सुविधांवर बोलताना आमदार राणे यांनी स्पष्ट केले की, शहरातील भुयारी गटार योजनेचे काम रखडवणाऱ्या जुन्या कॉन्ट्रॅक्टरला बदलून नवीन कॉन्ट्रॅक्टरला शिस्त लावली जाईल आणि दर्जेदार काम करून घेतले जाईल. तसेच, शहराच्या नळ पाणी योजनेच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेला ४३ कोटींचा निधी वापरून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला जाईल. कुडाळ एमआयडीसीच्या धर्तीवर मालवणमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधीमुक्त कचरा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी जमीन संपादन करून नवीन बायपास रस्ता तयार केला जाईल, ज्यामुळे मालवण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटेल, असे त्यांनी सांगितले. हा सर्व पैसा मालवणच्या जनतेचा आहे, त्यामुळे त्याचा एकही रुपया इकडेतिकडे जाता कामा नये, असा इशारा देत आमदार राणे यांनी नगराध्यक्षा आणि नगरसेवकांना कामांचा दर आठवड्याला फॉलोअप घेण्याच्या सूचना केल्या. कामांचे नियोजन करून पावसाळ्यापूर्वीची आणि पावसाळ्यानंतरची कामे वेळेत पूर्ण करा. अधिकारी किंवा इतर कोणी कामात अडथळा आणत असल्यास थेट माझे नाव घ्या, असेही ते म्हणाले.

विरोधी कितीही टीका करोत, मी माझ्या नाकासमोर बघून जनतेची कामे करत राहीन. आमदारकीचे पद हे मिरवण्यासाठी नसून जनतेची सेवा करण्यासाठी आहे आणि म्हणूनच मी १८-१८ तास काम करतो,” असे सांगत त्यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, मालवण शहराच्या पर्यटन सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शहराच्या विविध ५६ कामांसाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये रस्ते आणि गटारांच्या कामांचा समावेश असून, शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘जरीमरी ते आडारी बायपास’ हा पर्यायी मार्ग लवकरच सुरू केला जाणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, गेल्या चार महिन्यांत निलेश राणे यांनी मालवण शहरासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. निलेश राणे यांची एक वेगळी कार्यसंस्कृती आहे ते फक्त बोलत नाहीत, तर प्रत्यक्ष करून दाखवतात. त्यांनी दिलेला विकासाचा शब्द नेहमीच पाळला आहे. मालवणच्या पर्यटन सौंदर्यात आणि विकासात आमदार राणे खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. आपल्या मालवणला ‘आदर्श मालवण’ बनवण्यासाठी आपण सर्वांनी आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांना पूर्ण साथ दिली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी दत्ता सामंत, पूनम चव्हाण यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन करून संजय शिंदे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!