
चौके साळेल मार्गावरील चिरेखाणीत धक्कादायक घटना ; परिसरात खळबळ
मालवण : चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीत तरुणाने स्वतःच्या गळ्यासह शरीराच्या विविध भागांवर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज तालुक्यातील निलजी येथील मानदेश निगोडा पाटील हा तरुण चौके येथे चिरे भरण्यासाठी आलेल्या वाहनावर क्लीनर म्हणून काम करतो. आज तो चौके-साळेल मार्गावरील चिरेखाणीवर गेला होता. यावेळी त्याने सोबत आणलेल्या धारदार सुरीने स्वतःच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोट, हात तसेच शरीराच्या अन्य भागांवरही वार करून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिली मिठारी व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. मात्र जखमांची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी चौकशी सुरू केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेमंत धुरी, सुहास पांचाळ, सूरज रेडकर तसेच साळेलचे पोलीस पाटील रवींद्र गावडे यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन घटनेची माहिती घेतली. संबंधित तरुणाने आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
जखमी तरुणाला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, नांदरूखचे सरपंच भाऊ चव्हाण, बंड्या गावडे, मानस गावडे, अमोल चव्हाण, साई गावडे, गोठ्या गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. या घटनेमुळे चौके परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत मालवण पोलीस अधिक तपास करीत आहेत.






Subscribe to my channel






