
नुकसानीची आकडेवारी मिळताच मदत देणार; मंत्री नितेश राणेंचा विश्वास
बीडच्या गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी तलावाची पाहणीमत्स्यबीज, गाळ उपसा आणि KCC प्रश्नांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
बीड : कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या मच्छीमारांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देणार, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी तलावाची पाहणी करत त्यांनी मच्छीमारांच्या अडचणी जाणून घेतल्या. कमी पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, मत्स्यबीज नष्ट झाल्याने मत्स्य उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. या नुकसानीची अचूक आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्यात येईल. संकटाच्या काळात शासन मच्छीमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
तलावातील गाळ सिंचन व पाटबंधारे विभागामार्फत तातडीने काढून त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मच्छीमारांना दर्जेदार मत्स्यबीज उपलब्ध करून देणे, तसेच मत्स्यबीज नष्ट झाल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अपेक्षित ५४.६ मत्स्य उत्पादन उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या धर्तीवर मच्छीमारांनाही मदतीसाठी प्रयत्न
शेतकऱ्यांप्रमाणे संकटग्रस्त मच्छीमारांनाही मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका मंत्री राणे यांनी मांडली. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यामुळे मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड (KCC), वीजदर सवलत आणि अन्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. KCC धारक मच्छीमारांना बँकांकडून सहकार्य मिळत नसल्यास संबंधित प्रकरणांची तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय मच्छीमार संस्थांचे प्रलंबित अर्ज, बँकांकडून मिळणारे अर्थसहाय्य आणि अपघाती मृत्यू झालेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, प्रादेशिक उपायुक्त सुरेश भारती, भाजपाचे नेते तथा माजी मंत्री बदामराव पंडित, भाजपाचे नेते बाळराजे पवार तसेच मच्छीमार बांधव उपस्थित होते.







Subscribe to my channel






