आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १६ सप्टेंबरला

गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह शाळेच्या भविष्यातील विकासावर होणार चर्चा

सावंतवाडी : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाच्या माध्यमातून सन १९७९ मध्ये या शाळेची स्थापना झाली. शाळेपूर्वी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या गावांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत शाळेची स्थापना केली. त्यामुळे आरोस, साटेली, तळवणे, मळेवाड, दांडेली आणि सातार्डा या गावांतील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. पंचक्रोशीबाहेरील अनेक विद्यार्थ्यांनाही या प्रशालेने शिक्षण दिले.गेल्या अनेक दशकांत संस्थेने शाळेच्या शैक्षणिक तसेच भौतिक विकासासाठी सातत्याने योगदान दिले असून, आजपर्यंत हजारो विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने सन २०२५ मध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणणे, शाळेत उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी योगदान देणे, विविध ज्ञानवर्धक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे संघाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार असून, शाळेच्या भविष्यातील विकासासाठी विविध उपक्रमांवर चर्चा होणार आहे. तसेच माजी विद्यार्थी संघाची सदस्य नोंदणी देखील करण्यात येणार आहे.

“ज्या शाळेने आम्हाला शिक्षण, संस्कार आणि जीवनाची दिशा दिली, त्या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येणे व आपले योगदान देणे हीच आमची कृतज्ञता आहे,” अशी भावना माजी विद्यार्थी संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या स्नेहमेळाव्यास सर्व माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, आरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!