अक्कलकोट देवस्थानचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांचा राजकोट किल्ल्यावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सन्मान

मालवण येथील मांजरेकर कुटुंबियांच्या वतीने सत्कार ; विनयशील व्यक्तीमत्वामुळे महेश इंगळे धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील धडाडीचे नेते : भाई मांजरेकर

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोट नगरपरिषद निवडणूकीतून प्रभाग क्र. ११ ब मधून सलग पाचवेळा निवडून आलेले नगरसेवक महेश इंगळे हे त्यांच्या विनयशील व्यक्तीमत्वामुळे खऱ्या अर्थाने धार्मिक, सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील धडाडीचे नेते असल्याचे प्रतिपादन मालवण येथील खा. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते भाई मांजरेकर यांनी केले.

अक्कलकोट येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या विजयाचे व नुतन वर्षाचे औचित्य साधून श्री. मांजरेकर यांनी नगरसेवक महेश इंगळे यांना सदिच्छा भेट दिली. यावेळी भाई मांजरेकर यांनी सहकुटूंब श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व नगरसेवक महेश इंगळे यांचा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ व शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेल्या मालवण राजकोट येथे बसविलेली छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती भेट देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी बोलताना भाई मांजरेकर यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येणाऱ्या असंख्य भाविकांसह राज्यभरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे त्यांच्या अंगी असलेले कसब व प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या बहूआयामी व्यक्तीमत्वाची साक्ष देतात. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेवक पदाच्या माध्यमातून ते लोकसेवेसोबतच येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी आणखीन जलद व सुलभ स्वामी दर्शनाची सोय उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करून महेश इंगळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी युवा नेते प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सुनिल पवार व मांजरेकर मित्र परिवारातील मिलींद परूळेकर, प्रदीप कांबळी, अभय परब, संतोष गावडे, सिद्धाली गावडे, मानसी गावडे इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!