जिल्हा परिषद, पंचायत समितीवर महायुतीचाच भगवा फडकणार

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा विश्वास ; विरोधकांचा सुफडा साफ होण्याचाही केला दावा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महायुतीने आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कुंभारमाठ येथील मतदान केंद्रावर महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच वर्चस्व असेल, असे स्पष्ट केले.

श्री. सावंत म्हणाले की, “१९९० पासून खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्हा विकासाच्या दिशेने वेगाने धावत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे जिल्ह्यात नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही भक्कम महायुती साकारली गेली आहे.”

जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांमध्ये महायुतीची लाट आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व ५० जागा आणि पंचायत समितीच्या १०० जागांवर महायुतीचेच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील. सर्व पंचायत समित्यांचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महायुतीचेच विराजमान होतील. महायुतीमुळे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळणार असून विरोधकांचा सुपडा साफ होईल असेही श्री. सावंत यांनी स्पष्ट केले. 

यावेळी सावंत यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, मधुकर चव्हाण यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभारमाठ येथील केंद्रावर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

error: Content is protected !!