गणेश सजावट स्पर्धेतून शिवसेनेची संघटनात्मक ताकद घराघरात

उपक्रमांमुळे कुडाळ शहरातील संघटना मजबूत; आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आ. निलेश राणेंचे आवाहन

गणेश सजावट स्पर्धेतील ५१ विजेत्यांना सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात पारितोषिक वितरण

कुडाळ : कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे शहरातील संघटना अधिक मजबूत होत असून, गणेश सजावट स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना घराघरापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.

कुडाळ शहर मर्यादित शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या पुढाकाराने गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शहरातील तब्बल ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रभागनिहाय घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील ५१ विजेत्यांना सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील अंतिम निकालात प्रथम क्रमांक साई तळवणेकर, द्वितीय क्रमांक सत्यवान राऊळ आणि तृतीय क्रमांक दीपक पाटील यांनी मिळविला. तर उत्तेजनार्थ राजाराम गडेकर आणि प्रदीप राऊळ यांना पारितोषिक देण्यात आले.

यावेळी बोलताना आ. निलेश राणे म्हणाले की, शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले असून, हे उपक्रम पक्ष संघटना वाढीसाठी पूरक आहेत. गणेश सजावट स्पर्धेच्या माध्यमातून संघटना घराघरापर्यंत नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आगामी निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहरप्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदनी कांबळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

error: Content is protected !!