
मालवण : श्रावण गवळीवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेल्या बॅनरचा विपर्यास करून त्याचा संबंध आमदार निलेश राणे यांच्याशी जोडत सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत युवासेना तालुकाप्रमुख अभिमन्यू अर्जुन लाड यांनी संबंधिता विरोधात आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
याबाबत आचरा पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात लाड यांनी म्हटले आहे की, श्रावण गवळीवाडी ग्रामस्थांनी गावातील प्रलंबित कामे तसेच दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘यापुढे कोणत्याही पुढाऱ्याने किंवा राजकारण्याने गावात मत मागण्यासाठी येऊ नये’, अशा आशयाचा बॅनर लावला होता. या मूळ बॅनरवर आमदार निलेश राणे किंवा शिवसेना पक्षाचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र, या बॅनरचा विपर्यास करून सोशल मीडियावर त्याचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.
‘कुडाळ लाईव्ह’ व्हॉट्सॲप ग्रुपवर गोट्या चव्हाण व बाळा पावसकर यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अमर घाडी नामक युवकाकडून बॅनर एडिट करून आमदार निलेश राणे यांच्या नावाने प्रसारित केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
मूळ बॅनरमध्ये आमदार निलेश राणे किंवा शिवसेनेचा उल्लेख नसताना त्याचा एडिट करून राजकीय हेतूने वापर करण्यात आला असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अभिमन्यू लाड यांनी आचरा पोलिसांकडे केली आहे. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी, युवासेना उपजिल्हा प्रमुख मिहीर राणे, आडवली मालडी युवा विभाग प्रमुख गीतेश खेडेकर आदी उपस्थित होते.






Subscribe to my channel






