कौतुकास्पद ! मुणगे गावचा सुपुत्र राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित!
मसुरे | झुंजार पेडणेकर
देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि.प.पू.प्रा.केंद्रीय शाळा झोंबडी नं.१ शाळेचे पदवीधर शिक्षकश्री.सतिश पांडुरंग मुणगेकर यांना राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शैक्षिक आगाज ही आंतरराष्ट्रीय संस्था सामाजिक शैक्षाणिक पर्यावरण, वृक्ष संगोपन संवर्धन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सोशल मीडियाचा शिक्षणासाठी योग्य वापर असे विविध उपक्रम राबविणाऱ्या ऑनलाइन टीचिंग करणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चेत सहभाग घेणाऱ्या तसेच टाकाऊतून टिकाऊ अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना स्मार्ट टिचर या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करते. यात महाराष्ट्रातील शिक्षकांना ही राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. एका जिल्हा भरातून एक किंवा दोन शिक्षकांची निवड केली जाते. ऑनलाईनद्वारे या शैक्षिक आगाजचे मुख्य प्रवर्तक श्री. अमीत चौधरी, श्री. हेमन उपाध्याय, माजी डेप्युटी डायरेक्टर अजमेर राजस्थान, श्री. सुभाष राबरा डायरेक्टर ऑफ एनव्हिएस, संस्थापक अध्यक्षा श्रीमती स्मृती चौधरी, उत्तर प्रदेश , तसेच राज्य समन्वक महाराष्ट्र शैक्षिक आगाजचे श्री नाना पाटील भुसावळ आदि मान्यवरांनी सन्मानित केले.
सतिश पांडुरंग मुणगेकर हे मायक्रोसॉफ्ट सर्टीफाय एज्युकेटर असून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य चे राज्य संघटक आहेत. आविष्कार फाऊंडेशन इंडियाचे गुहागर तालुकाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहतात.
मुणगेकर यांनी स्वतःची व शाळेची ब्लॉग वेबसाईट तयार केलेली आहे. तसेच ३५ आॕफलाईन शैक्षणिक ॲपची निर्मिती करणारे जिल्ह्यातील एकमेव शिक्षक ठरले आहेत. शाळेचे सर्व शालेय अभिलेखे (रेकॉर्ड ) डिजिटल स्कूल सॉप्टवेअर मध्ये असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव शाळा त्यांनी बनविली आहे. शैक्षणिक ई – साहित्याची निर्मिती, फ्लिपबुक ई – साहित्याची निर्मिती, वोकलेट ई – साहित्याची निर्मिती, स्मार्ट पीडीएफची निर्मिती, व्हरचूल कलासरूम वापर, 3D, 4D तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर , आभासी प्रयोगशाळेचा अध्यापनात वापर, स्वतःचे स्वराली क्रिएशन यु ट्युब चॕनेल तसेच
विद्यार्थी व शिक्षक यांचे ओळखपत्र Q R CODE मध्ये तयार केलेले आहेत.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोकसंख्या शिक्षण या विभागात सलग विजयाची परंपरा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ऑनलाईन शिक्षक स्पर्धेत पीपीटी सादरीकरणात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे.
गुहागर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तसेच काही गावांमध्ये गुलमोहर, चिंच, बेहडा, इ.५०० रोपांचे मोफत वाटप त्यांनी केले आहे.
चिपळुणमध्ये आलेल्या महापुरात पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याची व आर्थिक मदत करण्यात सहभाग घेतला होता. यापूर्वी त्यांना राज्य शासनाचा राज्यस्तरीय पर्यावरण पूरक शिक्षक पुरस्कार २०१७, राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ प्राप्त झाला आहे. श्री सतिश मुणगेकर यांना राष्ट्रीय स्वरूपाचे स्मार्ट टिचर अवार्ड मिळाल्याबद्वल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.