
श्रावण गवळीवाडीतील बॅनर प्रकरणाने खळबळ; युवासेना आक्रमक, प्रितम गावडे यांची मालवण पोलिसांत तक्रार
मालवण : श्रावण गवळीवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेल्या बॅनरचा कथितरित्या विपर्यास करून त्यामध्ये आमदार निलेश राणे यांचे नाव जोडत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मूळ बॅनरवर निलेश राणे किंवा शिवसेना पक्षाचा साधा उल्लेखही नसताना एडिटेड छायाचित्राच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी युवासेना कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रितम गावडे यांनी मालवण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
श्रावण गवळीवाडीतील ग्रामस्थांनी गावातील प्रलंबित कामे आणि पूर्ण न झालेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त करणारा बॅनर लावला होता. “यापुढे कोणत्याही पुढाऱ्याने किंवा राजकारण्याने गावात मत मागण्यासाठी येऊ नये”, असा त्याचा आशय होता. या मूळ बॅनरमध्ये आमदार निलेश राणे यांचे नाव नव्हते. मात्र याच बॅनरचा फोटो कथितरित्या एडिट करून त्यावर निलेश राणे यांचे नाव टाकण्यात आले आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मूळ आशय बदलून राजकीय बदनामीचा प्रयत्न करण्यात आला का ? असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.
सोशल मीडियावर प्रसाराचे पुरावे पोलिसांकडे
प्रितम गावडे यांनी तक्रारीसोबत संबंधित एडिटेड छायाचित्रे आणि सोशल मीडिया प्रसाराचे पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत. ‘कुडाळ लाईव्ह’ व्हॉट्सअॅप ग्रुपवर गोट्या चव्हाण व बाळा पावसकर तसेच इन्स्टाग्रामवर अमर घाडी यांच्या माध्यमातून हा एडिटेड बॅनर प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ बॅनर आणि एडिटेड छायाचित्र यांची तांत्रिक पडताळणी करावी, सोशल मीडिया पोस्टचा स्रोत शोधावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा संदर्भ मूळ मजकुरात नसताना त्यात फेरफार करून तो प्रसारित केला जात असेल, तर त्यामागील उद्देश आणि जबाबदार व्यक्तींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे प्रितम गावडे यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे संबंधित व्यक्तीची सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन होऊ शकते, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली.
“मूळ बॅनरमध्ये निलेश राणे यांचे नाव नसताना ते एडिट करून जोडण्यात आले असेल, तर हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा तपास झाला पाहिजे. सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरविणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी गावडे यांनी केली आहे.
तक्रार दाखल करताना युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, तालुका सचिव तथागत मालवणकर, विहार कोदे, रोहन आचरेकर, निकीत वराडकर, ओमकार चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Subscribe to my channel






