ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महेश इंगळे यांचा आंगणेवाडीत हृदय सत्कार : सर्वांच्या सुख शांतीसाठी आई भराडी चरणी गाऱ्हाणे – इंगळे


मालवण | कुणाल मांजरेकर
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी आंगणेवाडी यात्रेला भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे आंगणे ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांचे स्वागत करून हृदय सत्कार करण्यात आला. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या आंगणेवाडीत येऊन भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याचा योग आज लाभला, लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहणाऱ्या आंगणेवाडी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन आंगणे ग्रामस्थ मंडळाने केले आहे, असे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलताना काढले.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्वयंभू असे स्थान आहे. भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात पसरली आहे. अशा यात्रेला उपस्थित राहून समाधान वाटले. सर्वांच्या सुख शांती साठी आपण आई भराडी चरणी गाऱ्हाणे घातले आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोट सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी, हडपिड मठ अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत, बाबू आंगणे, स्वामीभक्त व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रघुनाथ आंगणे, दाजी सावजी, सचिन लोके, दीपक आंगणे, सौ. नीलम पेडणेकर, श्री पितळे, समीर आंगणे, आबा आंगणे, प्रसाद आंगणे, दिनेश आंगणे, सौ लता पालयेकर तसेच इंगळे यांच्या समवेत बाबासाहेब निंबाळकर, डॉ. पाटील, देवर मुनी आदीसह विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी श्री. इंगळे म्हणाले, आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या आंगणेवाडीत येऊन भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याचा योग आज लाभला. एरवी बातम्यामध्ये या जत्रेची महती पाहत होतो, वाचत होतो. पण आज प्रत्यक्ष येथे येण्याचा योग आला. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्वयंभू असे स्थान आहे.

श्री स्वामी समर्थ आणि कोकणचे जुने नाते आहे. स्वामी समर्थ यांचे कोकणातही वास्तव्य होते. अशा पावन भूमीत येण्याचा आज योग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वामी समर्थांच्या विविध मठांना आपण भेटी देत आहोत. कोकणातून दरवर्षी बहुसंख्य स्वामी भक्त अक्कलकोट येथे भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतात. श्री भराडी देवी व श्री स्वामी समर्थ यांचा कृपाशिर्वाद सर्वांवर कायम रहावा असेही महेश इंगळे म्हणाले.
आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत आज अक्कलकोटच्या पावन भूमितील स्वामी दुतांचे आगमन झाले आहे. आई भराडी देवी प्रमाणे स्वामी समर्थांचे आशीर्वाद सर्व भक्तांच्या पाठीशी राहोत असे यावेळी बोलताना बाबू आंगणे म्हणाले. यावेळी हडपिड मठाच्या वतीने सन्मानचिन्ह आणि स्वामी कृपा वस्त्र अध्यक्ष छोटू आंगणे यांना प्रदान करण्यात आले. तसेच वटवृक्ष देवस्थान च्या वतीने आंगणे कुटुंबियांना स्वामी समर्थ फोटो आणि कृपावस्त्र आणि कृपा प्रसाद भेट देण्यात आला. यावेळी भाजप उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी महेश मालक इंगळे यांचे आशीर्वाद घेत ते सलग पाचव्यानंदा नगरसेवक झाल्याबद्दल सत्कार केला. आभार बाबू आंगणे यांनी मानले.

Subscribe to my channel




