सिंधुदुर्गच्या काजू-सुपारीला मिळणार गोव्याची बाजारपेठ

जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाचा गोवा अभ्यास दौरा; आगामी हंगामात ५ हजार मेट्रिक टन काजू खरेदीचे उद्दिष्ट

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारी, आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाल्याला योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा, तसेच उत्पादित शेतीमालासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोव्यातील फोंडा येथील ‘गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्था मर्यादित’ला भेट देत तेथील यशस्वी सहकारी बाजारपेठेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला.

या दौऱ्यात जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, काजू प्रक्रिया उद्योजक, तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी सहभागी झाले होते. गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र भिडे यांच्याशी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. संस्थेची खरेदी-विक्री व्यवस्था, मालाची प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विपणन यंत्रणेची माहिती घेत ॲग्रो प्रोसेसिंग युनिटलाही भेट दिली.

आठही तालुक्यांत खरेदी केंद्रे उभारण्याचे नियोजन

गोवा बागायतदार संस्थेने सहकाराच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या मालासाठी संघटित बाजारपेठ उभारण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील काजू विक्री संघ, सहकारी संस्था, बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकत्र आणून तालुकास्तरावर खरेदी केंद्रे, तर जिल्हास्तरावर मध्यवर्ती यंत्रणा विकसित करण्याचा विचार यावेळी मांडण्यात आला.

५ हजार मेट्रिक टन काजू खरेदीचे उद्दिष्ट

आगामी काजू हंगामापासून जिल्ह्यात किमान ५ हजार मेट्रिक टन काजू बी खरेदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. काजू आणि सुपारीची प्रतवारी करून गुणवत्तेनुसार दर ठरविण्यात येणार आहेत. सुपारीसाठीही स्वतंत्र खरेदी धोरण आखले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दर्जानुसार योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.

प्रक्रिया, ब्रँडिंगमधून शेतकऱ्यांना थेट लाभ

केवळ शेतीमाल खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक प्रक्रिया उद्योगांना चालना देणे, उत्पादनांचे आकर्षक पॅकिंग आणि स्वतंत्र ब्रँडिंग करणे, तसेच मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्री व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेतून मिळणारा नफा आणि लाभांश थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील काजू-सुपारीसह अन्य शेतीमालाला गोव्याची बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक सहकार क्षेत्र, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीलाही नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

या अभ्यास दौऱ्यात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, गणपत देसाई, विद्याधर परब, तुळशीदास रावराणे, अशोक सारंग, सुनील उकिडवे, दीपक ठाकूर, अमित आवटी, निलेश पवार, विलास ठाकूर, योगेश वालावलकर, चंद्रशेखर देसाई, डॉ. प्रसाद देवधर तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!