
पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्गनगरी येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्चे बॅडमिंटन कोर्ट व क्रीडा साहित्याचे लोकार्पण खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सिंधुदूर्गनगरी परिसरात अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, “जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा मिळाल्यास ते राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करू शकतात. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आगामी काळात सिंधुदुर्गनगरी परिसरात अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारून सिंधुदुर्गला आदर्श क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रत्येक टप्प्यावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही ते म्हणाले.

खासदार नारायण राणे यांनी आपल्या मनोगतात खेळ संस्कृती जोपासण्याची गरज अधोरेखित करताना सांगितले की, खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. खेळाडूंनी नियमित सरावासोबत पौष्टिक आहार आणि मानसिक-शारीरिक तंदुरुस्तीवर भर द्यावा. शासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत उपलब्ध करून दिली जाईल. सिंधुदुर्गमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू घडण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्ट तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधांमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अधिक सक्षमपणे तयारी करता येणार आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Subscribe to my channel






