कणकवलीतील आपल्याच सहकाऱ्याच्या पराभवामुळे मालवणात ना विजयाचा उन्माद, ना विजयी रॅली ; अत्यंत साधेपणाने मालवणचा विजय साजरा


मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी रविवारी पार पडली. राज्यात सर्वत्र जरी ह्या निवडणुका होत असल्या तरी राज्याचे लक्ष लागून राहिले होते, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांकडे ! त्यात विशेष करून सर्वांच्या नजरा होत्या, आमदार निलेश राणे यांच्या मतदार संघातील मालवण नगरपरिषद व त्यांचे बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदार संघातील कणकवली नगरपंचायतीकडे ! निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार तर नितेश राणे हे भाजपचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षीय धोरणामुळे हे दोन्ही बंधू या निवडणुकीत आमने सामने असल्याने या दोन निवडणुकांकडे हाय हॉल्टेज निवडणुका म्हणून पाहिल्या जात होत्या. मालवण नगरपालिकेच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आमदार निलेश राणे यांनी केलेले स्टिंग ऑपरेशन, भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव घेऊन केलेली टिका, भाजप उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरून उपस्थित केलेला प्रश्न व मतदानाच्या आदल्या रात्री मालवण पोलीस ठाण्याच्या आवारातील हायहॉल्टेज ड्रामा यामुळे मालवणची निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनली होती.
या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात आमदार निलेश राणे यांच्या मतदार संघातील मालवण नगरपरिषदेवर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर या विजयी झाल्या. तर २० पैकी १० जागा शिवसेनेकडे आल्या. तर आ. निलेश राणे यांच्याकडे जबाबदारी असलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने पाठींबा दिलेले शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झाले. कणकवली हा आ. निलेश राणे यांचे कनिष्ठ बंधू मंत्री नितेश राणे यांचा मतदार संघ. पक्षादेश मानून कणकवलीत संदेश पारकर यांना विजयी करण्यासाठी निलेश राणे यांनी मेहनत घेतली खरी, पण राणे परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या आणि बंधू नितेश राणे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव आ. निलेश राणे यांच्या देखील मनाला चटका लावून गेला. त्यामुळे प्रतिष्ठेच्या मालवणच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवून देखील निलेश राणे यांनी मालवणात ना विजयाचा उन्माद केला ना विजयी रॅली काढली. अत्यंत साधेपणे मालवणचा विजय साजरा करण्याच्या कृतीने आमदार निलेश राणे यांनी केवळ निवडणूकच नव्हे तर जनतेची मने देखील जिंकली. यातून संवेदनशील मनाचा राजकारणी पाहायला मिळाला.
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात अतिशय हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या मालवण व कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी बाजी मारत आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी केले, या अभूतपूर्व विजयानंतर स्वाभाविकपणे आमदार निलेश राणे हे मोठ्या जल्लोषात रॅली वगैरे काढून विजयोत्सव करतील अशी कार्यकर्त्यांसहित अनेकांची अपेक्षा होती. मात्र आमदार निलेश राणे यांनी जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात येऊनही पत्रकारांशी शांतपणे संवाद साधत आमच्या एका डोळ्यास हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू असल्याची प्रतिक्रिया दिली.
यावेळी विजयाचा गुलाल लावण्यासही नकार देत आमच्याच जवळच्या कार्यकर्त्यांचा कणकवलीत पराभव झाला, हे आपल्यासाठी अतिशय दुःखद असल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार निलेश राणे त्यांच्यात असलेला संवेदनशील हळवा राजकारणी सर्वांना दिसला, कणकवली नगरपंचायतीच्या ऐतिहासिक निकालानंतरही आमदार निलेश राणे हे कणकवली शहरातून निघालेल्या रॅलीत सहभागी झाले नाहीत.
एकट्याने लढून मिळलेल्या विजयाने हुरळून जाऊन विजयाचा उन्माद करत आव्हानाची भाषा करणारे अनेक राजकारणी आजच्या दिवशी राज्यभरात दिसले. मात्र कणकवलीत भाजपा उमेदवाराचा झालेला पराभव व एकंदरीतच स्वकियांशी नाईलाजाने द्यावा लागलेला लढा यामुळे दैदिप्यमान विजय मिळवूनही अतिशय शांतपणे विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत व पराभूत झालेल्या उमेदवारांच्याप्रती संवेदना व्यक्त करत आमदार निलेश राणे यांनी सर्वांची मने जिंकली आहेत.

Subscribe to my channel




