मालवणात उद्या मुथूट फिनकॉर्प सोने गैरव्यवहार प्रकरणातील पीडितांची महत्त्वपूर्ण बैठक

कायदेशीर लढ्याची पुढील दिशा ठरणार; पीडितांनी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

मालवण : मुथूट फिनकॉर्पच्या कथित सोने गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार महिला तसेच इतर पीडित व संबंधित व्यक्तींची सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्कार हॉल, धुरीवाडा, मालवण येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तज्ञ वकिलांकडून प्रकरणासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया, सामूहिक पाठपुरावा आणि भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

या प्रकरणात आणखी कोणी पीडित व्यक्ती अथवा संबंधित व्यक्ती असतील, तसेच त्यांच्याकडे प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती, कागदपत्रे किंवा अनुभव असल्यास त्यांनी पुढे येऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामूहिकरित्या कायदेशीर लढ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधितांनी बैठकीत आपली बाजू मांडावी. अधिकाधिक पीडित एकत्र आल्यास प्रकरणातील विविध बाबी समोर आणून पुढील कायदेशीर कारवाईबाबत योग्य दिशा ठरविण्यास मदत होणार आहे. एकजूट, कायदेशीर मार्गदर्शन आणि सामूहिक पाठपुराव्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असून, मुथूट फिनकॉर्प सोने गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित सर्व पीडित व संबंधित व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंचातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!