रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संघटनात्मक बांधणीवर मंथन

आमदार प्रमोद जठार यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; बूथस्तरापासून पक्षविस्तारावर भर

रत्नागिरी : आगामी काळातील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासोबतच बूथस्तरापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चिंतनाला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा २६६-रत्नागिरी विधानसभा चिंतन बैठक भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटनात्मक कामकाज, पक्षविस्तार आणि आगामी काळातील नियोजनाबाबत विविध मुद्द्यांवर विचारमंथन केले.

बैठकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम, पक्षाचा विस्तार तसेच बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार प्रमोद जठार आणि भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक कामकाज सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्यावर यावेळी भर देण्यात आला. तसेच विधानसभा मतदारसंघातील विविध स्थानिक विषयांचा आढावा घेत संघटन अधिक गतिमान करण्यासाठी पुढील काळातील कार्यपद्धती आणि नियोजनाबाबतही चर्चा झाली. पक्षाच्या प्रत्येक स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करून संघटन मजबूत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या चिंतन बैठकीला रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, रत्नागिरी मंडल अध्यक्ष, लोकप्रतिनिधी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!