नवोदयच्या परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखले : भाजपा- शिवसेना एकत्र !
काही परजिल्ह्यातील पालकांना स्थानिकांनी चोप ; मालवणात तणावाचे वातावरण
मालवण : नवोदयच्या परीक्षेसाठी स्थानिक विद्यार्थ्यांना डावलून परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्या बसवले जात असल्याच्या प्रकराची पोलखोल झाल्यानंतर देखील काही पालक परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घेऊन शहरातील भंडारी हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर दाखल झाल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे भाजपा- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव केल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी स्थानिकांशी हुज्जत घालणाऱ्या पालकांना पदाधिकाऱ्यांनी चोपही दिला. स्थानिक विद्यार्थ्यां व्यतिरिक्त एकाही परजिल्ह्यातील विद्यार्थ्याला मालवणमध्ये परीक्षेस बसू देण्यात आले नाही. परिक्षा केंद्रावर प्रभारी पोलिस निरिक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी परजिल्ह्यातील 19 बोगस विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आल्याच्या प्रकार युवासेना, शिवसेना पदाधिकार्यांनी उघडकीस आणला होता. भाजपच्या पदाधिकार्यांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत संबंधित प्रशालेच्या मुख्याध्यापकांना धारेवर धरत जाब विचारला होता. त्या प्रशालेत आढळून आलेल्या १९ विद्यार्थ्यांची हॉल तिकीट तत्काळ मागवून घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकाने हॉल तिकीट मागावून घेत ती संस्थाध्यक्षांच्या ताब्यात दिली होती. नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देत स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करत दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी केली.
आज येथील भंडारी हायस्कूलच्या केंद्रावर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी सकाळपासून शिवसेना, युवासेना, भाजप, काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परिक्षेस बसू न देण्यासाठी फिल्डिंग लावली होती. हॉल तिकीट ताब्यात घेतल्यानंतरही परजिल्ह्यातील पालक आपल्या विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी येथे घेवून दाखल झाले होते. यात काही पालकांना शहरातील विविध भागात रोखण्यात आले. यात काही पालकांना स्थानिकांनी चोपही दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिक्षा केंद्राच्या बाहेर तसेच चारही बाजूंनी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी फिल्डिंग लावत परजिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यांला परिक्षा केंद्रात जावू दिले नाही. परजिल्ह्यातील काही पालकांनी आपण लांब राहत आपल्या पाल्याला परिक्षा केंद्रावर पाठविले होते. अशा विद्यार्थ्यांची माहिती पदाधिकार्यांनी घेत त्या विद्यार्थ्यांना परिक्षेस बसू दिले नाही. परिक्षा केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परिक्षा केंद्राच्या बाहेर शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, मंदार केणी, दादा नाईक, मंदार लुडबे, आबा हडकर, राष्ट्रीय काँग्रेसचे अरविंद मोंडकर, महेश जावकर, अवि सामंत, प्रसाद आडवणकर, नरेश हुले, ललित चव्हाण, बाबी जोगी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तालुक्यात जे १९ बोगस विद्यार्थी आढळले होते. त्यातील एकाही विद्यार्थ्याला या परिक्षेस बसू दिले नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.