ठेकेदाराकडून पगार थकला ; मालवणात कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापतींची यशस्वी मध्यस्थी ; कामबंद आंदोलन स्थगित

मालवण : गणेश चतुर्थी सण नजिक आला असताना पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून एक महिन्याचा पगार थकीत राहिल्याने रविवारी सकाळी मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामबंद आंदोलन पुकारले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी तात्काळ नगरपालिकेत दाखल होत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांची मागणी लक्षात घेत ठेकेदाराने तात्काळ प्रलंबित पगार देण्याची ग्वाही दिल्याने सुमारे चार ते पाच तास चाललेले हे कामबंद आंदोलन कामगारांनी मागे घेत पुन्हा कामावर परतले.

मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी सकाळी सात वाजल्यापासून अचानकपणे काम बंद आंदोलन केले. या आंदोलना विषयी कळताच उबाठा शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी नगरपालिकेत जाऊन कामगारांची भूमिका जाणून घेत आंदोलनास पाठिंबा दिला.

नगराध्यक्ष, आरोग्य सभापतींची तत्परता

आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. पूनम चव्हाण या तालुक्या बाहेर होत्या. तर नगराध्यक्षा ममता वराडकर देखील कौटुंबिक वैद्यकीय कारणास्तव बाहेर होत्या. हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ मालवणात येऊन नगरपालिकेत जात कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. या दरम्यान उपगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीही नगरपालिकेत दाखल होत कामगारांची भूमिका जाणून घेतली. यानंतर झालेल्या चर्चेतून कामगारांना थकीत पगार देण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी हे कामबंद आंदोलन मागे घेतले.

error: Content is protected !!