युवासेना इम्पॅक्ट ! अडचणीत आलेल्या मुख्याध्यापकांनी “त्या” विद्यार्थ्यांची हॉलतिकीट घेतली परत

संपूर्ण प्रकाराची चौकशी करून मुख्याध्यापक दोषी आढळल्यास कारवाई करा

युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, मंदार केणी यांसह संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांची मागणी

कुणाल मांजरेकर

मालवण : नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखवल्याच्या घटनेचा मालवणात युवासेनेने पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. वायंगणी हायस्कुलमध्ये हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने मुख्याध्यापकांनी संबंधित १९ विद्यार्थ्यांची “हॉलतिकिटे” परत घेतली आहेत. दरम्यान, या घटनेची संबंधित शिक्षण संस्थेने देखील गंभीर दखल घेतली असून शाळेची बदनामी करणाऱ्या मुख्याध्यापकांची चौकशी करून त्यांच्यावर दोषी आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांच्यासह युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

मालवण तालुक्यातील वायंगणी हायस्कुल मध्ये मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला होता. युवासेनेच्या माध्यमातून त्या शाळेत धडक देत संपूर्ण कारभाराची पोलखोल केली होती. याप्रश्नी ग्रामस्थ व संस्था पदाधिकारीही आक्रमक बनले होते. ३० एप्रिलला होणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेस नियमबाह्य प्रवेश असलेलल्या जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देणार नाही. मुख्याध्यापक यांनी त्या मुलांना दिलेली हॉल तिकीट त्यांच्याकडून मागवून घ्यावी, अशी मागणी युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर, सुजित जाधव, मंदार केणी यांनी केली होती. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना दिलेली हॉल तिकीट मागून घेतली आहेत. संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांच्याकडे दिली आहेत, अशी माहिती युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी यांनी दिली.

दरम्यान मालवण तालुका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वायंगणी शाळा येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. मुलांची हॉल तिकीट मागून घेतली म्हणजे हे प्रकरण संपले असे नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यापूर्वीही असे प्रवेश देण्यात आले होते का ? याचीही चौकशी झाली पाहिजे. असे प्रवेश झाले असतील तर ते रद्द झाले पाहिजेत. संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्या बरोबर शिक्षण विभागाचे कोणी अधिकारी यात सहभागी आहेत का ? याचीही उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी पं. स. सदस्य उदय दुखंडे यांनी केली आहे. तर याप्रश्नी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून कारवाईची मागणी करणार असल्याचे उदय दुखंडे यांनी सांगितले.

संस्था अध्यक्ष सदानंद राणे देखील आक्रमक

नियमबाह्य पद्धतीने पराजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय शाळा प्रवेश मिळण्यासाठी आमच्या शाळेत त्यांचे प्रवेश दाखवून शाळेची बदनामी करणाऱ्या मुख्याध्यापक यांची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांनी स्पष्ट केली आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!