देवगड : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आमदार प्रमोद जठार यांनी सहपरिवार दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जाऊन भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी महादेवाची विधिवत पूजा-अर्चा करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्यातील जनतेच्या आरोग्य, आनंद आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
श्रावणातील पहिल्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.
कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर मनाला आध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली. श्रावणाच्या पवित्र पर्वाची सुरुवात कुणकेश्वर महादेवाच्या दर्शनाने झाल्याने हा क्षण अत्यंत आनंददायी आणि समाधान देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.