मालवण नगर परिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर अभिनंदन विशेष



कुणाल मांजरेकर ( मालवण)
मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ‘शुन्य’ म्हणून हिणवल्या गेलेल्या शिवसेनेने प्रत्यक्ष निकालावेळी आपली ‘जादू’ दाखवत नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या १० जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता हस्तगत केली. ऐनवेळी तुटलेली महायुती अन् मित्रपक्ष भाजपचा स्वबळावर लढण्याचा निर्णय यामुळे २० जागांवर उमेदवार उभे करताना शिवसेनेची अक्षरशः दमछाक झाली. मात्र अशावेळी आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कोळशाच्या खाणीतून अस्सल हिऱ्यांची पारख करत आपले उमेदवार उभे केले. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार ४ जागाही आणू शकत नाहीत, असा विरोधकांचा होरा असताना शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह १० जागांवर आपले उमेदवार निवडून आणत पालिकेवर सत्ता मिळवली. शिवसेनेच्या या विजयात मोठा वाटा राहिला तो उमेदवार निवडीचा… ! शिवसेनेने तळागाळात राहून काम करणारे आणि जनसामान्यातील उमेदवार उभे केल्याने हे उत्तुंग यश मिळवले. शिवसेनेने निवडलेल्या याच हिऱ्यातील ‘कोहिनुर’ म्हणजे प्रभाग ६ मधील मेढा राजकोटचे नगरसेवक व प्रतिथयश मत्स्य व पर्यटन उद्योजक सहदेव बापर्डेकर… ! प्रभाग ६ मधील प्रतिष्ठेच्या लढतीत स्वतः विजय मिळवताना आपल्या सहकारी नगरसेविका व नगराध्यक्ष उमेदवार यांच्या विजयातही मोलाचे योगदान देणारे सहदेव बापर्डेकर हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. आजवर राणे कुटुंबीय असो अथवा स्थानिक निवडणुकांमध्ये राणेंच्या विचाराच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सहदेव बापर्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. यंदाच्या पालिकेत ते स्वतः निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर त्यांच्या सहका ऱ्यांनी दिवसरात्र एक करून त्यांचा विजयश्री खेचून आणला. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या विषय समिती निवडणुकीत आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी बापर्डेकर यांची प्रतिष्ठेच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी निवड करून त्यांच्या “निष्ठेचा” खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. सहदेव बापर्डेकर हे खूप कमी बोलतात. पण कामात आपला हात कोणी धरू शकत नाही, हे नव्या जबाबदारीतून ते नक्कीच सिद्ध करतील, असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.

खासदार नारायण राणे १९९० मध्ये मालवण मतदार संघातून पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांच्या सोबत जी कार्यकर्त्यांची फौज होती, त्यापैकीच सहदेव बापर्डेकर हे एक होय. सहदेव बापर्डेकर यांच्या कार्याची पोचपावती म्हणून राणे साहेबांनी 1995, 96 च्या दरम्यान त्यांना शिवसेना मालवण शहरप्रमुखपदी बढती दिली. बापर्डेकर यांनी आपल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय दिला. मध्यंतरीच्या काळात व्यवसाय उद्योग याकडे अधिक लक्ष दिल्याने राजकीय पटलापासून ते काहीसे दूर होते. मात्र राणेसाहेबांच्या मार्गदर्शनात घडलेला हा कार्यकर्ता शहर तसेच प्रभागातील सामाजिक सेवेत अखंडित कार्यरत राहिला. परिसरातील गरजू व्यक्तींच्या हाकेला धावून जाण्याच्या वृत्तीने त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला.
मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे मालवण कुडाळचे आमदार झाले. नितेश राणे राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. राणे साहेबांप्रमाणे या दोघांची कार्यशैली जिल्हा अनुभवत असताना सहदेव बापर्डेकर हेही पुन्हा राजकीय प्रवाहात सामील झाले. राणेसाहेबांचे आशीर्वाद व मार्गदर्शन सोबत घेऊन सहदेव बापार्डेकर यांची नवी राजकीय इनिंग सुरू झाली. त्याला निमित्त ठरले शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत.

काही महिन्यांपूर्वी मेढा राजकोट येथे एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असताना दत्ता सामंत म्हणाले राणेसाहेबांच्या आशीर्वादाने सहदेव बापर्डेकर लवकरच मोठ्या पदावर असतील. त्यानंतर काही महिन्यातच नगरपालिका निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी सहदेव बापर्डेकर यांना नगरसेवक पदाचे तिकीट दिले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्यातून राजकोट, मेढा, सुतारवाडा, कोतेवाडा, चिवला बीच या मालवण नगरपरिषद प्रभाग सहा मधील जनतेच्या मोठ्या पाठिंबावर सहदेव बापर्डेकर नगरसेवक म्हणून विजयी झाले.

सहदेव बापर्डेकर यांचा सुरू झालेला नगरसेवक पदाचा प्रवास आमदार निलेश राणे यांच्या भक्कम पाठबळावर मालवण नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम सभापती पदावर पोहोचला आहे.मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, आमचे आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जो विश्वास दाखवला त्याला पात्र राहून राणे साहेबांना अपेक्षित असे जनसेवेचे कार्य माझ्या हातून घडेल.
राजकोट, मेढा, सुतारवाडा, कोतेवाडा, चिवला बीच या प्रभाग सहा मधील मतदार व नागरिक यांनी नगरसेवक म्हणून मला विजयी केले त्यामुळेच आज मालवण शहराचा बांधकाम सभापती झालो आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व सर्व सहकारी नगरसेवक यांच्या सोबतीने संपूर्ण मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. असे सांगत सहदेव बापर्डेकर यांनी मालवण शहर वासियांचे आभार व्यक्त आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शना मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले लक्ष राहील. मालवण शहरातील जनतेला जलद आणि सुलभ सेवा देण्यासाठी तत्पर राहीन. राणे साहेबांच्या मार्गदर्शनात आमदार निलेश राणे यांना अपेक्षित असे कार्य करण्यासाठी सदैव जनसेवेत राहणार असल्याचे सहदेव बापर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे.
राजकोट मच्छीमार संस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणून सहदेव बापर्डेकर यांनी 15 वर्षे सेवा दिली. या कार्यकाळात संस्था सभासदांना अधिक सक्षम करण्याच्या हेतूने राणे साहेबांच्या माध्यमातून 15 एनसीडीसी बोट तसेच एक इन्सुलेटेड वाहनही उपलब्ध करून दिले. संस्था सभासद यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच राहिला. आज मत्स्य व पर्यटन उद्योजक म्हणून त्यांची ओळख असून आपल्या व्यवसायाची सांगड घालत जनसेवेत देखील ते कमी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त होताना दिसत आहे

Subscribe to my channel




