नारायण राणेंच्या समर्थनार्थ भाजपा “मैदानात” ; फडणवीस, दरेकर, मुनगंटीवार “आक्रमक” !
आगीशी खेळाल तर प्रयत्न वाईट होतील… मुनगंटीवार यांचा प्रशासनाला इशारा
वारे वा… ठाकरे सरकार ! आशिष शेलारांचा “ट्वीटर” वरून संताप
कुणाल मांजरेकर
आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या बजावलेल्या नोटीसीवरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. एका जबाबदार केंद्रीय मंत्र्याला अशा प्रकारे हजर राहण्याची नोटीस देणे चुकीचे असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तर फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे, आणि तालिबान्यांसारखे वागायचे… वारे वा… ठाकरे सरकार … अशा शब्दात आमदार आशिष शेलार यांनी आपल्या संतप्त भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. तर नारायण राणे हे आग आहेत, आगीशी खेळाल तर प्रयत्न वाईट होतील, असा इशारा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
राज्यात पोलिसांना दरोडेखोरांना पकडायला वेळ नाही, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ नाही, राज्यात सट्टा बाजार जोमाने चालू आहे. मात्र त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. परंतु एका आमदाराला अटक करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सिंधुदुर्गात सुरू केलेल्या दडपशाहीचा आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या नोटिशीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, अशी भावना माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात संपूर्ण भाजपा राणेंच्या पाठीशी असल्याचे फडणवीस म्हणाले.
तर राणेंना अटक करण्यासाठी सरकार अतिरेकी कारवाई करीत आहे. कुणालाही चौकशीसाठी बोलावणं हा पोलिसांचा अधिकार आहे. पण ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात सूडबुद्धीचे राजकारण सुरू आहे, ते निषेधार्थ आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत आपला पराभव होणार हे लक्षात आल्याने सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर करुन राणेंना जेरीस आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. पण पोलिसानी प्रोटोकॉल न पाळता राणेंना नोटीस दिल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग पोलिसांनी देशातील एका केंद्रीय मंत्र्याला नोटीस दिली आहे. नारायण राणे हे १३० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना फोन लाऊन नितेश राणेंबाबत चौकशी करता आली असती. मात्र जाणीवपूर्वक राणेंना चौकशीसाठी बोलावून आगीशी खेळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
वा रे वा … ठाकरे सरकार : आशिष शेलारांचं ट्विट
“कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात… वारे वा..ठाकरे सरकार!
फुले, शाहू, आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे!” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.