आठवीतील मुलीने जिल्ह्याच्या अख्ख्या पोलिसांना लावले कामाला ; स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

पोलिसांकडून रात्रभर शोधमोहीम ; सहा तासानंतर प्रकरणाचा उलगडा

फिल्मी स्टाईल अपहरणाच्या बनावात सख्ख्या भावाची मदत : मालवण तालुक्यातील घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ

मालवण : शाळेतील अभ्यास करण्याचा कंटाळा, पण घरातील व्यक्तींकडून अभ्यास करण्यासाठी होणारा तगादा याच्या रागातून आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका शाळकरी मुलीने स्वतःच्या सख्ख्या भावाच्या मदतीने आपल्याच फिल्मी स्टाईल अपहरणाचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार मालवणात घडला आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर रात्री ९ वा. पासून रात्रभर पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु केली. जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः या सर्च मोहिमेवर लक्ष ठेवून होते. अखेर मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने शहरातीलच एका भागात तीचे वास्तव्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यावेळी उलट तपासणीत तीने स्वतच्या अपहरणाचा बनाव आपणच रचल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मालवण तालुक्यातील एका गावात राहणारी ही मुलगी शहरातील एका शाळेत आठवीत शिक्षण घेत आहे. या शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मोबाईलद्वारे मालवण पोलिसांना तिच्या नातेवाईकानी दिली. त्यानंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा तिच्या शोधासाठी कामाला लागली. मुलगी आपल्या भावासमवेत दळण टाकण्यासाठी जातो असे सांगून घरातून दुचाकीने बाहेर पडली होती. गुढीपाडव्याच्या बंदोबस्तातून दमून आलेले पोलीस ही तक्रार प्राप्त होताच रात्री ९ वा. पासून या मुलीच्या शोधास लागले. जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा हाय अलर्ट वर नेऊन वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली. शाळकरी मुलगी गुरूवारी संध्याकाळी मालवण शहरात दाखल झाली होती. तीने आपल्या भावाला ‘माझे अपहरण झाल्याचे कुटुंबियांना सांग’ असे सांगून दुचाकीने पळ काढला होता. रात्री शहरात राहून एका घरात जेवणाचाही आस्वाद घेतला होता. मुलीच्या सांगण्या प्रमाणे तीच्या भावानेही तीच्या अपहरणाचा बनाव हुबेहुबपणे पोलीस यंत्रणांना सांगितला. यात एका ओमनी मधून काही युवक उतरले, त्यांनी तीला उचलून गाडीत घातले, तीला इजेक्शन देण्यात आले आणि घेऊन गेले. या घटनेनंतर पोलीसांनी सर्व रस्त्यांवरील आणि घराबाहेरीलही सीसीटिव्ही फुटजची तपासणी केली. सर्वत्र नाकाबंदी करून शोध मोहिम राबविली. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्वतःहून याप्रकरणी तपास यंत्रणांना सूचना करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यातील शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी गांभिर्यपुर्वक सर्व तपास सुरू केला होता. यासाठी जिल्ह्यातील अनेक टिम मालवणमध्ये मालवण पोलीसांच्या मदतीला आले होते. रात्रभर सर्वत्र शोध मोहिम करण्यात आली होती.

मोबाईल लोकेशनने मुलगी पोलीसांना किनारपट्टीवरील एका घरातून सापडली. तीला घेऊन पोलीस तातडीने रूग्णालयात दाखल झाले होते, तीला इंजेक्शन देण्यात आल्याने त्याबाबत पोलीसांनी तपास करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पोहचले होते. त्यानंतर तीला घेऊन पुढील तपासासाठी इनकॅमेरा माहिती देण्यासाठी तीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. पोलीस ठाण्यात तीचे नातेवाईकही उपस्थित झाल्यानंतर तीने सर्व प्रकरणाचा उलगडा केला. यात तीने स्वतः बनाव रचल्याचे कबूल केले. यामुळे तब्बल सहा ते सात तास मालवणमध्ये चाललेल्या पोलीसांच्या तपासाला पूर्णविराम मिळाला.

error: Content is protected !!