रेवतळेत गोवा बनावटीची १ लाख ५८ हजारांची दारू जप्त; एकावर कारवाई
मालवण : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. रेवतळे येथे पोलिसांनी छापा टाकून गोवा बनावटीची तब्बल १ लाख ५८ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली. रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी विलास गणपत मुणगेकर (रा. रेवतळे, ता. मालवण) यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. गोवा बनावटीची दारू अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, हेड कॉन्स्टेबल हुंबे आणि हेड कॉन्स्टेबल पेडणेकर यांचा समावेश होता.
मालवण तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सातत्याने कारवाई सुरू ठेवल्याने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायाला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.