उपशिक्षिका तब्बल २० वर्षे गैरहजर ; तरीही सेवा समाप्तीची कारवाई नाही !
असगणी शाळा नं. १ मधील धक्कादायक प्रकार
तातडीने पर्यायी शिक्षक द्या ; सुनील घाडीगांवकर यांची मागणी
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील शाळा नं. १ मधील उपशिक्षिका तब्बल २० वर्ष गैरहजर आहे. मात्र तरीही प्रशासनाने तिच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली नसल्याचा धक्कादायक प्रकार मालवण पंचायत समितीच्या सभेत उघड झाला आहे. २००२ सालापासून सुट्टीवर गेलेली ही शिक्षिका २०२२ साल उजाडले तरी अद्याप शाळेवर गेलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन लागू करण्यासाठीच तिच्यावर कारवाई केली गेली नाही का असाच सवाल निर्माण झाला आहे. दरम्यान, ही शिक्षिका अद्यापही असगणी शाळेच्या पटावर असल्याने या ठिकाणी पर्यायी शिक्षक नेमता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून या ठिकाणी तातडीने पर्यायी शिक्षक नेमला जावा अशी मागणी पं. स. चे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी केली आहे.
मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत हा प्रकार उघड झाला आहे. सदरील उपशिक्षिका या ३/७/२००२ रोजी असगणी शाळा नं. १ मध्ये उपशिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या रजेवर गेल्या, त्या अद्याप परत आल्या नाहीत. तब्बल २० वर्षे त्या रजेवर असताना अजूनही त्या सेवेत का ? असा सवाल सुनील घाडीगांवकर यांनी उपस्थित केला. त्यांची पेन्शन लागू होण्यासाठी त्यांना सेवेत कायम ठेवलंय का ? असा सवालही त्यांनी केला. यावर सदरील शिक्षिकेवर प्रशासकीय कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यावर याबाबतचा निर्णय होईपर्यंत असगणी शाळेत पर्यायी शिक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी सुनील घाडीगांवकर यांनी केली.