४२९ निवेदने, १७.१७ कोटींची कामे; वंचित समाजाच्या मागण्यांना पालकमंत्र्यांकडून विकासाची दिशा

जनता दरबार केवळ प्रसिद्धीसाठी नाही; मागण्यांचा हिशोब जनतेसमोर मांडणे हे कर्तव्य : ना. नितेश राणे

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी झालेल्या पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारातून प्राप्त झालेल्या ४२९ निवेदनांपैकी १३.७९ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून, मंत्रालय स्तरावरील आणखी ३.३८ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल १७.१७ कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यातील २२ कामे पूर्ण झाली असून १०९ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री राणे म्हणाले, “जनता दरबार घेऊन केवळ प्रसिद्धी मिळविणे हा उद्देश नाही. नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्याचा हिशोब जनतेसमोर मांडणे हे आपले कर्तव्य आहे.” जनता दरबारात वंचित समाजातील नागरिकांच्या विविध अडीअडचणी आणि मागण्या जाणून घेण्यात आल्या. यातील काही मागण्या मंत्रालय स्तरावरील, तर काही जिल्हा पातळीवरील होत्या. पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या १३.७९ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. कामांना मंजुरी देऊन फाईल बंद करण्याऐवजी ती दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या हाती देण्यासाठी पालकमंत्री संपर्क कार्यालय सातत्याने पाठपुरावा करणार, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

जातिवाचक, आक्षेपार्ह गावांची नावे बदलली

वंचित समाजाच्या विकासाच्या दृष्टीने जनता दरबारातून अनेक महत्त्वाच्या मागण्यांना प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्यातील काही गावांची जातिवाचक अथवा आक्षेपार्ह नावे बदलण्याची मागणीही नागरिकांनी केली होती. लोकांच्या इच्छेनुसार संबंधित गावांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला, हीदेखील या जनता दरबाराची महत्त्वाची फलश्रुती असल्याचे राणे यांनी सांगितले. वंचित बहुजन समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. वाड्या-वस्त्यांवर मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाच्या पाठपुराव्याचे कौतुक

जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, निवृत्त अधिकारी अजयकुमार सर्वगोड आणि पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे प्रमुख मनोज भोगटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वंचित समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचे पालकमंत्री राणे यांनी नमूद केले.

गणेशोत्सवानंतर दुसरा जनता दरबार

गणेशोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा वंचित समाजाचा जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही राणे यांनी केली. या जनता दरबारातून प्राप्त होणाऱ्या नव्या निवेदनांच्या आधारे वंचित समाजाच्या विकासासाठी पुढील कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील आमदार, खासदार नारायण राणे आणि सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन वंचित समाजाच्या उन्नतीसाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!