धक्कादायक | मालवणात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात लाखोंचे घबाड ; आ. निलेश राणेंनी स्वतः घातली धाड

सुमारे २० ते २५ लाखांची रक्कम ; मालवणात तणाव निर्माण

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर पैशाचे वाटप सुरु : निलेश राणेंचा आरोप

पोलीस व निवडणूक विभागाने गस्त वाढवावी, माझे कार्यकर्ते देखील आज पासून “वॉच”वर ; पैसे वाटताना मिळून आल्यास बंदोबस्त करण्याचा इशारा

मालवण : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरात सुमारे २० ते २५ लाखांची रोकड मिळून आली आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्वतः केनावडेकर यांच्या घरावर धाड घालून या प्रकाराचा पर्दाफाश केला. भाजपचे कुडाळ मधील पदाधिकारी बंड्या सावंत याठिकाणी आढळून आले. त्यांनीच ही रक्कम आणल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला असून ही रक्कम निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणली गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याना पाचारण करून या घरात आणखी काही पैशाने भरलेल्या बॅग असल्याचा संशय व्यक्त करत संपूर्ण घराची झडती घ्यावी, असे निलेश राणे यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी याठिकाणी धाड घातली. यावेळी भाजपचे कुडाळ येथील पदाधिकारी बंड्या सावंत व त्यांचा चालक घटनास्थळी उपस्थित होते. येथील एका खोलीत पिशवीत मोठ्या प्रमाणात रक्कम दिसून आली. त्याबाबत निलेश राणे यांनी विचारणा केली असता ही रक्कम आपल्या व्यवसायाची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांचे उत्तर अयोग्य वाटल्याने निलेश राणे यांनी पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याना फोन लावून बोलवून घेतले.यावेळी निवडणूक विभागाचे भरारी पथक दाखल झाल्यानंतर तालुक्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी न आल्याने निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा करून भाजपा च्या सात ते आठ पदाधिकाऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पैसे असून पोलिसांनी गस्त कडक करावी. माझे कार्यकर्ते देखिल स्वतः गस्त घालणार असून अशा प्रकारे पैसे वाटताना आढळून आल्यास आमच्या पद्दतीने बंदोबस्त करू, असा इशारा देत या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निलेश राणे यांनी केली आहे

error: Content is protected !!