Malvan | नगरपरिषदेच्या तत्परतेमुळेच बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीला कामाला सुरुवात!

महायुतीच्या लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून नागरिक-पर्यटकांना दिलासा; बोअरवेल उभारणीचीही तयारी

नगरपरिषदेच्या कामाचे श्रेय लाटण्याचा उबाठाचा केविलवाणा प्रयत्न; दहा वर्षांच्या सत्ताकाळात काय केले? स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांचा सवाल

मालवण : मालवण बंदर जेटीवरील सार्वजनिक प्रसाधनगृहातील असुविधा दूर करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने तत्पर पावले उचलली असून, दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, स्थायी समितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानंतर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामाचे श्रेय लाटण्याचा उबाठा गटाचा प्रयत्न म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा घणाघात स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी केला आहे.

मालवण बंदर जेटी परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहात विविध असुविधा असल्याची तक्रार स्थानिक व्यावसायिकांनी नगरपरिषदेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पाण्याची कमतरता, तुटलेल्या अवस्थेतील स्लॅब, अपुरी विद्युत व्यवस्था आणि अस्वच्छतेच्या समस्या निदर्शनास आल्या. आगामी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर या समस्या तातडीने सोडविण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय प्राधान्याने मांडण्यात आला. नगराध्यक्षांनी आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाला आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रसाधनगृहाच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आली आहे. केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता प्रसाधनगृहासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने बोअरवेल उभारण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दहा वर्षे सत्तेत असताना बंदर जेटीच्या सुविधांकडे दुर्लक्ष का?

मालवण बंदर जेटी हे शहरातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. मागील दहा वर्षे उबाठा गटाची सत्ता असताना आणि त्यांचे आमदार असतानाही या ठिकाणच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न का सुटला नाही? सार्वजनिक प्रसाधनगृहातील असुविधा दूर करण्यासाठी त्यावेळी ठोस उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? असा सवाल पूनम चव्हाण यांनी उपस्थित केला. दहा वर्षे सत्तेत राहून ज्या समस्या सोडविता आल्या नाहीत, त्या समस्या अवघ्या नऊ महिन्यांत सुटल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करणे हास्यास्पद आहे. स्वतःच्या सत्ताकाळातील निष्क्रियता झाकण्यासाठी आता महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याची धडपड सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

विकासकामांना गती मिळताच विरोधकांचा जळफळाट!

आमदार निलेश राणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मालवण शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध होत असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती आणि महायुतीचे नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करीत आहेत.

नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विविध विकासकामे मार्गी लागत असताना विरोधकांकडून मात्र सातत्याने टीका केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. एआय व्हिडिओ तयार करून मालवण शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीनेही योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

किनारपट्टी भागात अद्ययावत सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारणार!

मालवणची पर्यटननगरी म्हणून ओळख अधिक मजबूत करण्यासाठी पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर नगरपरिषद भर देणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून बंदर जेटीसह किनारपट्टी भागात अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि अन्य नागरी सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. आमचे प्राधान्य प्रसिद्धी मिळविणे किंवा श्रेयवाद नसून नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि प्रत्यक्ष विकासकामे पूर्ण करणे हेच आहे. विरोधकांनी कितीही स्टंटबाजी केली तरी मालवण शहराच्या विकासाचा वेग थांबणार नाही, असा ठाम विश्वास स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!