
आळंदीहून सहलीसाठी आले होते ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक; समुद्रातील प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना
रायगड : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने दिवेआगर परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खासगी शिकवणी वर्गातील ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक असे एकूण ४४ जण सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रकिनारी काही विद्यार्थी पोहोण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही जण पाण्यात ओढले गेले. या दुर्घटनेत ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून ते बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत. मृत विद्यार्थ्यांपैकी सर्वजण अकरावीतील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिकांकडून बचावकार्यात मदत
घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनीही बचावकार्यात मदत केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. दुर्घटनेचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला. आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
दुर्घटनेची माहिती मिळताच विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता पसरली. पालक आणि नातेवाईक आरोग्य केंद्राकडे दाखल होत आहेत. मृत विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासह अन्य आवश्यक प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण करण्यात येत आहे.







Subscribe to my channel






