
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे’ हा विश्वास द्या; पालकमंत्री नितेश राणे यांचे भाजप लोकप्रतिनिधींना निर्देश
कणकवली : सिंधुदुर्गातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, नुकसानीची वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि ‘महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे’ हा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन बैठकीत जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्षांना हे निर्देश देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती गंभीर होत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही सक्रिय भूमिका बजावावी, या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांनी ही तातडीची ऑनलाइन बैठक घेतली. यापूर्वीही त्यांनी जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची तसेच कोकणाच्या भौगोलिक व कृषी परिस्थितीनुसार नुकसानभरपाईच्या निकषांचा विचार करण्याची मागणी केली आहे.
‘आता खरी जबाबदारी लोकप्रतिनिधींची’
“आता खरी जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे,” या भूमिकेतून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याने आपल्या मतदारसंघातील गावांचा तातडीने दौरा करावा. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, पिकांच्या नुकसानीची माहिती संकलित करावी आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या मदतीचा लाभ पोहोचवण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटा नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकरी आणि जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
केवळ पाहणी नाही; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधा
शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना केवळ औपचारिक पाहणी न करता त्यांच्या अडचणी मनापासून जाणून घ्याव्यात. पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता, शेतीचे झालेले नुकसान आणि शासनाकडून अपेक्षित मदत याबाबत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. कोणताही दिखावा न करता वस्तुस्थिती समजून घेऊन ती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांसोबत पशुधनाचीही काळजी घ्या
दुष्काळसदृश्य परिस्थितीचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नसून जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या भागातील पशुधनाची परिस्थिती, चाऱ्याची उपलब्धता, पाण्याची स्थिती तसेच पशुपालकांच्या अडचणींचाही आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले.
आठही तालुक्यांतील परिस्थितीवर लक्ष
सिंधुदुर्गातील सर्व आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ‘ट्रिगर-१’च्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा बारकाईने आढावा घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, पाणीटंचाई आणि संभाव्य नुकसान याबाबत प्रशासनाकडूनही आढावा सुरू आहे.
‘सरकार तुमच्या पाठीशी’ हा विश्वास द्या!
शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभी पिके संकटात असताना त्यांना केवळ मदतीची नव्हे, तर आधार आणि विश्वासाचीही गरज आहे. त्यामुळे प्रत्येक भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्याने तातडीने आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, त्यांचा आवाज ऐकावा, नुकसानीची माहिती घ्यावी आणि शासनाच्या मदतीसाठी आवश्यक पाठपुरावा करावा.
“संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहणे हीच लोकप्रतिनिधींची खरी भूमिका आहे,” असा संदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत दिला.







Subscribe to my channel






