मालवणात जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या भात विक्री नोंदणीचा आढावा

तालुका खरेदी विक्री संघाला भेट : शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर संख्या वाढवण्याचा निर्णय

मालवण : राज्य शासनाच्या आधारभूत किंमत भात खरेदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावाने शासकीय खरेदी केंद्रावर भात विक्री करायचा आहे. त्या शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. मालवण तालुका खरेदी विक्री संघ केंद्रावर सुरू असलेल्या कामकाजाचा मंगळवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांची नोंदणी सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी डाटा ऑपरेटर संख्या वाढवा तसेच महसूल अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती ठेवा, अशा सूचना करून त्याची अंमलबजावणी बुधवार पासून करण्याबाबत यावेळी सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी नोंदचा आढावा घेण्यात आला.

यावेळी मालवण तहसिलदार अजय पाटणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. एस. देसाई, खरेदी विक्री संघ अध्यक्ष आबा हडकर, व्यवस्थापक दिनेश ढोलम यासह मंडळ अधिकारी लोबो, तलाठी, महसूल कर्मचारी व संघाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खरेदी विक्री संघाच्या सिंधू बाजार गोडाऊनची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.

धान (भात) खरेदी ही शासनाच्या ऑनलाइन पोर्टल माध्यमातून करण्यात येणार आहे. आगाऊ नोंदणी करताना चालू हंगामातील भात पीक लागवड नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावाने विक्री करायची आहे, तो नोंदणीवेळी समक्ष उपस्थित आवश्यक आहेत. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून १५ ऑक्टोबर नोंदणीची अंतिम तारीख आहे. अशी माहिती देण्यात आली.

गतवर्षी मालवणात १,८५० क्विंटल भात खरेदी

गतवर्षी मालवण तालुक्यातील १५४ शेतकऱ्यांच्या माध्यमातून १,८५० क्विंटल भात खरेदी शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. अशी माहिती मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून देण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!