बुकेऐवजी “बंधारा”, पोस्टरऐवजी “आरोग्यसेवा” !

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ५० हून अधिक कच्चे बंधारे; ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान महाआरोग्य शिबिरांचे आयोजन

सावंतवाडी : वाढदिवसाचा खर्च केवळ सत्कार, पुष्पगुच्छ आणि जाहिरातींवर न करता त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी केला आहे. वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लोकसहभागातून ५० हून अधिक कच्चे बंधारे उभारण्याबरोबरच महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेनिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे विशाल परब यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी ‘बुकेऐवजी बंधारा, पोस्टरऐवजी आरोग्यसेवा!’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

जलसंधारणातून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न

जिल्ह्यासह महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असताना पाण्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविल्यास भूजलपातळी टिकविण्यास मदत होईल आणि भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करता येईल, या उद्देशाने लोकसहभागातून कच्चे बंधारे बांधण्याचे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात कोंडुरा येथे पहिल्या बंधाऱ्याच्या कामाने होणार आहे. त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून बंधारे उभारण्यात येणार आहेत.

वेंगुर्ला तालुक्यात तुळस, वेतोरा, आसोली, वायंगणी, खानोली, म्हापण, अणसुर, पालकरवाडी, मातोंड, केळुस, आरवली, सागरतीर्थ, मठ, उभादांडा, मोचेमाड आणि आडेली आदी ठिकाणी बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अणसुर येथे दोन, आरवली येथे तीन, मठ येथे दोन, मोचेमाड येथे तीन आणि आडेली येथे चार बंधारे, तर अन्य गावांमध्येही विविध ठिकाणी बंधारे उभारण्यात येणार आहेत. स्थानिक ग्रामस्थ, महिला गट, शेतकरी गट, भजनी मंडळे, सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा या अभियानात सहभाग राहणार आहे. २ ऑक्टोबर रोजी पालकरवाडी येथे सकाळी ९.३० वाजता, तर ४ ऑक्टोबर रोजी तुळस येथे सकाळी ८ वाजता बंधारा बांधणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान महाआरोग्य शिबिरे

जलसंधारणासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन शहरांसह विविध जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये ही शिबिरे घेण्यात येणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील टेलिमेडिसिन केंद्रांवर औषधे आणि आवश्यक आरोग्यविषयक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे केवळ तपासणीपुरती मर्यादित न ठेवता, गरज असलेल्या रुग्णांना पुढील औषधोपचार मिळवून देणे तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे परब यांनी सांगितले.

तीन शहरांसाठी वैकुंठ रथ देण्याची घोषणा

पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते तथा सावंतवाडीचे उप नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर विशाल परब यांनी येत्या १५ ऑक्टोबर रोजी तीन शहरांसाठी वैकुंठ रथ संबंधित नगरपरिषदांकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही विशाल परब यांनी केले. वाढदिवसाच्या निमित्ताने जलसंधारण, आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘सेवा हाच उत्सव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!