नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे प्रतिपादन ; पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने महिला दिनाच्या निमित्ताने पाककला आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न



मालवण : स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा आणि तिच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने महिला दिनाच्या निमित्ताने पाककला आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करुन महिलांच्या कल्पकतेचा, सृजनतेचा आणि एकतेचा असा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे, असे प्रतिपादन मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी पाककला आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्ष वराडकर या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, माजी नगराध्यक्ष अर्चना मिठबावकर, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका दर्शना कासवकर, मेघा गावकर, अनिता गिरकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, भाग्यश्री मयेकर, महिला व बालकल्याण विभागप्रमुख रसिका कुलकर्णी, परीक्षक संजय गावडे व विनय चव्हाण यांच्यासह संतोषी कांदळकर, शुभांगी तुळसकर, रसिका मयेकर, आर्या मयेकर, दिक्षा गावकर आदी व इतर उपस्थित होते.
प्रारंभी अन्वेषा आचरेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात अन्वेषा आचरेकर यांनी स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून ती समाजाच्या प्रगतीची मुख्य शक्ती आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक रूपांमध्ये स्त्री आपले आयुष्य घडवत असते. समाजात शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आज महिला शिक्षण, व्यवसाय, प्रशासन आणि नेतृत्व या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. हे बदल समाजासाठी अभिमानास्पद आहेत. पण अजूनही अनेक ठिकाणी महिलांना समान संधी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि समान हक्क यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. वराडकर पुढे म्हणाल्या, मालवण नगरपालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे महिला दिनासारखे कार्यक्रम होऊ शकले नाही. मात्र आता मालवण नगरपालिकेत जनतेची सत्ता आली आहे, त्यामुळे यापुढे महिलांच्या व नागरिकांच्या हिताचे कार्यक्रम राबवले जातील. आज महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांनी या ठिकाणी सुंदररित्या स्टॉलची मांडणी केली आहे. तर पाककला स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलानी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नाचणी पासून पदार्थ बनविले आहे एकूणच महिलावर्गांनी आपली कल्पकता या स्पर्धेच्या निमित्ताने साकारली आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या स्पर्धेत ज्यांना पारितोषिक मिळाली नाहीत त्यांनी खचून न जाता पुढच्या वर्षी अधिक जोमाने स्पर्धेत सहभाग घेऊन यशाचे मानकरी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.

Subscribe to my channel




