गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती

चंद्रशेखर बावनकुळे सहअध्यक्ष, समितीत जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, नितेश राणे यांचा समावेश

मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; मंत्री नितेश राणेंची माहिती

मुंबई : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर सदस्य म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक आणि मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मी स्वतः या समितीचा सदस्य आहे. काही ठिकाणी थडगी उभी करून हिरवी चादर टाकली जाते. अशी थडगी किंवा अनधिकृत बांधकामे हटवायला गेले की लोक जमा होतात. अनेक वेळा अशा ठिकाणी हत्यारेही सापडली आहेत. इतिहास पुसण्याचे काम जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून होत आहे. आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाची वाकडी नजर खपवून घेणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, “आताच हिरवी चादर गुंडाळली नाही, तर उद्या ते कोणाला ऐकणार नाहीत. हिंदू राष्ट्रात हिरवी चादर हटविण्यासाठी कोणाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. उद्यापासून या दिशेने कारवाई सुरू होईल. आमच्या समितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या विषयावर तडजोड न करणारे लोक आहेत”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!