
‘झोया मरीन’च्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार; रेडी बंदर, आरोंदा जेटी आणि ताज पंचतारांकित प्रकल्पही लवकरच मार्गी लावणार
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला औद्योगिक विकासाची नवी दिशा देत स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टीने तळवणे येथे महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी उत्साहात पार पडले.
“माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याची ही मुहूर्तमेढ आहे,” असे प्रतिपादन नितेश राणे यांनी यावेळी केले. या प्रकल्पामुळे सुरुवातीच्या टप्प्यात २०० बोटींचे बांधकाम तळवणे येथे होणार असून सुमारे २०० स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी गोवा, मुंबई किंवा अन्य शहरांकडे स्थलांतर करावे लागू नये, यासाठी जिल्ह्यातच रोजगारनिर्मिती करण्याचा निर्धार केला आहे. ‘झोया मरीन’च्या माध्यमातून रिव्हर्स मायग्रेशनची सुरुवात होत असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
या प्रकल्पातून मुंबईतील वॉटर मेट्रोसाठी आवश्यक बोटींच्या निर्मितीचे काम होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रकल्प उभारणीनंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यांत पहिली बोट तयार करण्याचे नियोजन आहे. स्थानिक युवकांना केवळ रोजगारच नव्हे, तर कुशल कामगार आणि कारागीर म्हणून घडविण्यासाठी प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
‘नारायण राणेंना पहिल्या बोटीच्या शुभारंभाला आणणार’
“सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम नारायण राणे यांनी केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी त्यांना आणण्याचा मानस होता. मात्र, भूमिपूजनाऐवजी या प्रकल्पातून तयार होणाऱ्या पहिल्या बोटीच्या शुभारंभाला त्यांना येथे आणायचे आहे,” असे नितेश राणे यांनी आवर्जून सांगितले.
जिल्ह्याच्या विकासाबाबत नकारात्मक भूमिका घेणाऱ्यांना उत्तर देत बसण्यापेक्षा कामातून उत्तर देण्याचा निर्धार केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चिपी विमानतळ आणि मुंबई-गोवा महामार्गासारखे प्रकल्प पूर्णत्वास गेले, तर विरोधामुळे काही प्रकल्प रखडल्याचे त्यांनी नमूद केले.
रेडी बंदर, आरोंदा जेटी अन् ताज प्रकल्पाला गती
“ही तर केवळ सुरुवात आहे,” असे सांगत नितेश राणे यांनी आगामी विकासकामांची रूपरेषाही मांडली. आरोंदा जेटी लवकरच सुरू होणार असून रेडी बंदर शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देवगड बंदरलाही चालना देण्यात येणार आहे. या बंदरांमुळे पर्यटन, जलवाहतूक आणि व्यापाराची नवी दालने खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिरोडा-वेळागर येथील ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाची घोषणा लवकरच मुख्यमंत्र्यांकडून होणार असून दोडामार्गातील आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातूनही नवीन उद्योग येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“विकासाची सवय लावून घ्या; आशावादी व्हा”
सिंधुदुर्गातील जनतेने आता नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून विकासाला साथ देण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले. “विरोधासाठी विरोध करणाऱ्यांना थारा देऊ नका. विकासाची सवय लावून घ्या आणि आशावादी व्हा. आपल्या युवकांना रोजगार कसा मिळेल, त्यासाठी काय कौशल्य आत्मसात करावे लागेल, याचा विचार करा,” असे ते म्हणाले. पर्यावरणपूरक प्रकल्पांची मागणी करणाऱ्यांनी आता अशा प्रकल्पांचे स्वागत करून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गुंतवणूकदारांचे विशेष आभार
या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद देणारे झोया मरीन सर्व्हिसेसचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया तसेच प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे डॉ. निलेश बाणावलीकर यांचे नितेश राणे यांनी विशेष आभार मानले. प्रकल्प यशस्वीपणे आणि कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
“सुवर्णाक्षरांनी लिहावा असा क्षण”
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी स्वातंत्र्यदिनी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे सांगितले. तळवणे गावाला देशाच्या नकाशावर पोहोचविण्याची क्षमता या प्रकल्पात असून स्थानिकांनी सहकार्य केल्यास आणखी प्रकल्प जिल्ह्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी हा दिवस “जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण” असल्याचे सांगितले. नारायण राणे यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नितेश राणे यांनी घेतली असून जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मोठे काम होईल, असे ते म्हणाले.
माजी आमदार राजन तेली यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खात्याच्या माध्यमातून सिंधुदुर्गात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. लवकरच आरोंदा जेटीही सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीनचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया, डॉ. निलेश बाणावलीकर, युवराज लखमराजे भोंसले, प्रितेश राऊळ, काका कुडाळकर, सुस्मिता जाधव, गौरव मुळीक, अपर्णा सातोसकर, शर्वाणी गावकर, संदीप नेमळेकर, स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Subscribe to my channel






