सिंधुदुर्गात जि. प., पं. स. निवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागणार, महायुतीला १०० % यश मिळेल

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

खासदार नारायण राणे, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाली असून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत उमेदवारांचा घरोघरी प्रचार सुरु आहे. या निवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागून महायुतीला १०० टक्के यश मिळेल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे..

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची यशस्वी वाटचाल सुरू असून नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील महायुतीला अशाच प्रकारे भव्यदिव्य यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. अलीकडील दोन अधिवेशनांमध्ये आमदार निलेश राणे यांनी अभ्यासपूर्व मुद्दे मांडून मतदार संघात विकास निधी आणण्यात यश मिळवले. यामुळे याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला महायुतीला होऊन शंभर टक्के जागांवर आमचे उमेदवार सहज विजय होतील असे सांगून आम्हाला विरोधकांचे कोणतेही आव्हान नाही. महायुतीच्या उमेदवारांसमोरील आपले अर्ज उबाठाचे उमेदवार स्वतःहून मागे घेत असून काही ठिकाणी उबाठाची नेतेमंडळी स्वतःच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगून आपल्याच उमेदवारांची गळंचेपी करत आहेत. त्यामुळे उबाठाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार महायुतीकडे आकर्षित होतानाचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. मालवण मध्ये जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या 12 तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या 18 ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!