“निलक्रांती” च्या बहुउद्देशिय केंद्राचे कुडाळ येथे उद्घाटन
समृध्दी फुड्स आणि युवा परिवर्तन संस्थेचा सहभाग
कुडाळ : राष्ट्रीय शिक्षकदिनाचे औचित्य साधून निलक्रांती संस्था आणि समृद्धी फुड्स चा संयुक्त उपक्रम असलेल्या बहुउद्देशिय केंद्राचे हिंदु कॉलनी, कुडाळ येथे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जयंत जावडेकर, फणसगाव येथील निवृत्त शिक्षिका व बचत गटांना आर्थिक साक्षर करणाऱ्या सौ. अलका नारकर तसेच रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर अध्यक्ष डॉ.विवेक रेडकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
सदर बहुउद्देशिय केंद्राचा मुख्य उद्देश हा प्रशिक्षण आणि कौशल्य वृध्दी द्वारे रोजगार निर्मिती आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ मान्यता प्राप्त असलेल्या युवा परिवर्तन या देशव्यापी नोंदणीकृत संस्थेची मान्यता यास मिळाली आहे. अद्ययावत असलेल्या सदर केंद्रामधून सुमारे १३० विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अन्नप्रक्रिया, कृषी, मत्स्य, पर्यटन आरोग्य या प्रमुख विषय बरोबरच उद्योग स्नेही विषयांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित विषयात प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थिना सरकारमान्य प्रमाणपत्र दिले जाणार असून सरकारी योजना आणि कर्ज मागणीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. मोफत अथवा माफक नोंदणी शुल्क घेऊन सदरचे विषय शिकवले जाणार आहेत व त्यासाठी अनुभवी तसेच तज्ञ मार्गदर्शन लाभणार आहे.या उद्घाटनप्रसंगी युवा परिवर्तन चे अजित परब- सिनियर डायरेक्टर, सुरेश उतेकर-ऑपरेशन हेड दत्तात्रय परुळेकर-सिनियर एरिया मॅनेजर दीपक कुडाळकर, विवेक नाईक- कार्यक्रम अधिकारी निशांत फिटनेस अकॅडमीचे निशांत तोरसकर, कळणे हायस्कूल च्या निवृत्त शिक्षिका सौ.संगीता तोरसकर, कौशल्य वृद्धी शिक्षिका सौ.वंदना चव्हाण तसेच टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका सौ. ज्योती बुवा, निलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. निलक्रांती संस्था आणि समृद्धी फुड्स चा संयुक्त उपक्रम असलेल्या बहुउद्देशिय केंद्राला शुभेच्छा देताना संपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन देणार असल्याचे सावंतवाडीचे मुख्य अधिकारी जयंत जावडेकर यांनी सांगितले.रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांनी आरोग्य सेवे विषयक प्रशिक्षित माणूस मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सदर केंद्रा बरोबर विविध उपक्रम घेणार असल्याचे जाहीर केले. तर सौ.अलका नारकर यांनी बचत गट सक्षमीकरणासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. समृध्दी फुड्सच्या सौ. प्राची धुरी यांनी आभार व्यक्त केले.