२०१८ मध्ये सुरु झालेल्या हेल्थ पार्कला आजपर्यंत १५ हजार विद्यार्थी आणि खेळाडूंची भेट


चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने ड्रीम हेल्थ संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. टी. रामासामी (पद्मविभूषण) यांच्याहस्ते उदघाट्न करण्यात आलेल्या या ड्रीम हेल्थ पार्कला आजपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पाटण, सातारा, कराड, मुंबई, पुणे, ठाणे अश्या अनेक भागातून जिल्हा परिषद शाळातील सुमारे १५ हजार विद्यार्थी आणि खेळाडूंनी भेटी दिल्या आहेत.
हे संग्रहालय प्रशस्त अश्या १६०० चौ. मी. जागेत उभारण्यात आले आहे. जेणेकरून १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना हसत खेळत त्याचा आस्वाद घेता येईल आणि योग्य माहिती मिळेल. बालपणात घडलेले संस्कार, सवयी या कायमस्वरूपी मनावर कोरल्या जातात हे लक्षात घेऊन या पार्क मध्ये आहार, विहार, आचार, शारीरिक सवयी, मानसिक आरोग्य यावर भर देऊन खेळातून प्रबोधन करण्यात आले आहे. या हेल्थ पार्कमध्ये प्रवेश करतानाच विद्यार्थी स्वतःची वजन उंची मोजून स्वतःचा बॉडी मास इंडेक्स मोजतात आणि मग पुढील प्रवास सुरु होतो.
अतिस्थूल मुलांनी कोणता आहार टाळावा ? ते सर्व पदार्थ आणि योग्य आहार काय ? रक्तक्षय कसा ओळखावा ? त्यासाठी आहारात कोणत्या फळ आणि भाज्यांचा समावेश असावा ? ती फळे, पदार्थ स्वतः पाहतात आणि नोंद करून ठेवतात. जंक फूड, चायनीज पदार्थातील मोनोसोडियम ग्लुटामेट याच्या प्रदर्शनाला भेट देतात आणि मग या पुढे मी हे हानीकारक पदार्थ सेवन करणार नाही, असा निश्चय करूनच पुढे जातात. मग दृष्टी आणि चष्म्याचा नंबर मोजण्याचे चार्ट्स वापरून “अ” जीवनसत्व असणारी फळे आणि भाज्या यांची माहिती घेतात. स्क्रीन वर आपण किती वेळ घालवतो ? कसे बसतो ? आणि त्याचे दुष्परिणाम काय ? हेही समजून घेतात.
हेल्थ पार्क संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे प्रबोधन हा नवा विचार घेऊन भ.क.ल. वालावलकर रुग्णालय पुढे होणाऱ्या आजारांवर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
लहान मुलांना होणार मानसिक ताण ओळखण्यासाठी काही खेळ खेळले जातात आणि त्यावर उपायही म्हणून योग ध्यान याचे प्रयोग सुचवले जातात.तरुणांसाठी लैंगिक शिक्षण, मासिक पाळी, गर्भनिरोधक औषधांचे प्रकार समजावणारी अनेक मॉडेल्स मदत करतात. अनवाणी चालणे, वृक्षारोपण आणि यामुळे मिळणार प्राणवायू आणि तिथे असलेल्या सेल्फी पॉईंट वर फोटो कडून बागेतील खेळाचा आनंद त्यांना लुटता येतो. भारतीय संस्कृती व प्रत्येक सणाला केलेलं पदार्थ आणि त्यानूतन मिळणारे घटक याचे ही ज्ञान मुलांना मिळते. देशप्रेम वृद्धिंगत व्हावे आणि योग्य माहिती भूगोल आणि इतिहासाबाबत मिळावी याकरिता हि मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.

Subscribe to my channel




