
शहरात ‘डोअर टू डोअर’ कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी आरोग्य विभागाला घेरलं
सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी ;… तर स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा
मालवण : मालवण नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कचऱ्या वरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार रणकंदन माजले. शहरात ‘डोअर टू डोअर’ कचरा उचलण्याचे काम योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी केला. ही वस्तुस्थिती सत्ताधाऱ्यांनी मान्य केल्याने जर कचरा उचलला जात नाही हे मान्य आहे, तर गेल्या सहा महिन्यांत ठेकेदाराचे १ कोटी २० लाखांचे बिल का अदा केले? असा सवाल नगरसेवक मंदार ओरसकर यांनी उपस्थित केला. सप्टेंबर महिन्यात नवीन निविदा प्रक्रिया राबवावी आणि पुढील दोन महिन्यांचे बिल रोखून ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. यावर ज्या नगरसेवकांच्या प्रभागात कचरा गाडी जात नसेल तेथे तक्रार नोंदवल्यास कारवाई केली जाईल, तसेच वेळप्रसंगी स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाईचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला.
मालवण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेस उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्यासह महेश कांदळगावकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, रविकिरण तोरसकर, ललित चव्हाण, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, अन्वेषा आचरेकर, मंदार केणी, सुदेश आचरेकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, मेघा सावंत आदी नगरसेवक-नगरसेविका व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मामा वरेरकर नाट्यगृहाचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत
मामा वरेरकर नाट्यगृहाच्या इमारतीला २६ वर्षे पूर्ण झाली असून सध्या तिची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात इमारत कोसळण्याची भीती व्यक्त करत, याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी केली. नाट्यगृहासाठी निधी मंजूर असून त्याचा डीपीआर बनवून वेळीच शासनाला सादर करावा. तरच शासनाकडून निधी उपलब्ध होईल, असे सांगून उद्या नाट्यगृहाचा स्लॅब कोसळल्यास संपूर्ण राज्यात मालवणची नाचक्की होईल, अशी भीती सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केली.
नाट्यगृहाच्या पाठीमागील पालिकेच्या जागेत उभ्या असलेल्या स्पीड बोटीचे लाखो रुपयांचे इंजिन कोणी काढून नेले, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक मंदार केणी यांनी केली.
शहरात अनेक नवीन घरे बांधली गेली आहेत. त्यामुळे एजन्सी नेमून संपूर्ण शहराचा सर्व्हे करावा आणि त्यानंतरच घरपट्टी वाढीचा परिपूर्ण ठराव पालिका सभेत आणावा, अशी सूचना सुदेश आचरेकर यांनी केली. यावर एका महिन्यात एजन्सी नेमून एकही घर सुटणार नाही अशा प्रकारे सर्व्हे केला जाईल, असे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी स्पष्ट केले.
विषय समित्याच्या बैठकीचे निमंत्रण मुख्याधिकाऱ्यानाच नाही
आरोग्य समितीच्या सदस्या उबाठाच्या नगरसेविका अनिता गिरकर यांना समितीच्या सभेचे निमंत्रण वेळेत दिले जात नसल्याचे महेंद्र म्हाडगुत यांनी सांगितले. यावरून विषय समित्यांच्या बैठकीचे निमंत्रण आपल्याला दिले जात नसल्याने निधी उपलब्धतेबाबत मार्गदर्शन करता येत नाही, अशी खंत मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यापुढे बैठकीपूर्वी आपल्याला व नगराध्यक्षांना पूर्वकल्पना द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनाच बैठका कळवल्या जात नसतील तर मालवण नगरपालिका नक्की कोण चालवतंय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
डास प्रतिबंधक फवारणी ठराविक भागातच
शहरात डास प्रतिबंधक फवारणी केवळ ठराविक भागातच होत असल्याचा आक्षेप नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी घेतला. यावर आरोग्य विभागातील १७ पैकी केवळ ९ कर्मचारी कार्यरत असल्याने काम संथ सुरू असल्याचे आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, गटारात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने ते बंद करावे, तसेच पूर्वीप्रमाणे घरोघरी जाऊन शौचालयाच्या पाईपना जाळ्या बसविणे व सांडपाण्याची डबकी बुजविणे ही कामे पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी मंदार केणी यांनी केली. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून कार्यवाही केली जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गटारात सांडपाणी सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्याची मागणी तपस्वी मयेकर यांनी केली.
नवीन मासळी मंडई उभारण्याऐवजी सध्याच्या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करावा आणि यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून संबंधित शासन निर्णयात बदल करण्याची मागणी केली जाईल, असे मुख्याधिकारी थोरात यांनी स्पष्ट केले.
बाजारातील विक्रेत्यांकडून वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया राबवून पालिकेचे उत्पन्न वाढवावे, अशी मागणी सुदेश आचरेकर यांनी केली. त्यानुसार विविध विक्रेत्यांसाठी दर निश्चित करण्यात आले. याशिवाय शहरात बसवले जाणारे एलईडी दिवे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप सुदेश आचरेकर यांनी केला. या दिव्यांसाठी नगरपालिका 1300 रुपये मोजत असून हे दिवे खुल्या बाजारात 300 ते 350 रुपयांना मिळतात. मग बाकीचा मलिदा नक्की खातंय कोण? नगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी सुदेश आचरेकर यांनी करत शहरात चांगल्या दर्जाचे दिवे बसवण्याची मागणी आचरेकर व मंदार केणी यांनी केली.






Subscribe to my channel






