२०२४ ला विनायक राऊतला एवढं जोरात आपटणार की परत कोकणात दिसणार नाही !

निलेश राणेंचा इशारा : फक्त मुलाबाळांना सेटल करण्यासाठी राऊतांकडून खासदारकीचा वापर

राणेसाहेबांनी कार्यकर्त्याना जेवढं जपलं, तेवढं कोणालाही जमलं नाही

वाक्याचा विपर्यास्त करण्याची विनायक राऊतना जुनी सवय

कुणाल मांजरेकर

मालवण : खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खासदारकीच्या काळात कोणतीही विकास कामे केली नाहीत. राणेसाहेबांचे नाव घेतलं की आपलं सगळं काही झाकलं जाईल या भ्रमात अजूनही ते वावरत आहेत. मात्र २०२४ ला विनायक राऊतना एवढ्या जोरात आपटणार की परत कोकणात दिसणार पण नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. विनायक राऊत यांनी आपल्या खासदारकीचा वापर फक्त स्वतःच्या मुलाबाळांना आणि कुटुंबांना सेटल करण्यासाठी केला आहे, असे सांगून राणेसाहेबांनी कार्यकर्त्यांना जेवढं जपलं, तेवढ कोणालाही जमलं नाही. वाक्याचा विपर्यास्त करण्याची जुनी सवय विनायक राऊतना असून त्यांच्या बुद्धीप्रमाणेच ते सगळ्या गोष्टीचा विचार करणार, अशा शब्दात निलेश राणेंनी विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, संतोष कोदे, नगरसेवक दीपक पाटकर, महेश मांजरेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निलेश राणे म्हणाले, फुकटचे श्रेय घेण्यासाठी सगळीकडे पुढेपुढे असणारे विनायक राऊत विकास कामांमध्ये कुठेही दिसत नाहीत. म्हणून त्यांना नेहमी राणे लागतात. राणेंशिवाय विनायक राऊत यांचे कार्य शुन्य आहे. ते कधीही विकासकामांवर बोललेले दिसत नाहीत, ज्यांनी साधी एक बालवाडीही उघडली नाही, अशा माणसाची राणे साहेबांवर बोलण्याची कुवत नाही. अगोदर त्यांनी काहीतरी करून दाखवावं. साधी डिस्पेंसरी तरी उघडून दाखवावी, असे सांगून स्वतःच्या खासदारकीचा वापर त्यांनी मुलाबाळांना सेट करण्यासाठी साठी केला आहे. चिपी विमानतळ असो अथवा मुंबई गोवा महामार्गावरील टोल नाका, या प्रत्येक ठिकाणी स्वतःला काहीतरी मिळण्यासाठी विनायक राऊतांची धडपड आहे. त्यासाठी ते केंद्रातील मंत्र्यांना भेटत असल्याचे सांगून विमानतळावर सिक्युरिटी साठी मिळणारे कंत्राट स्वतःला भाच्याला मिळण्यासाठी विनायक राऊत प्रयत्न करत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!